महागाई कमी होऊनही विकास दराला चालना देण्याच्या दृष्टीने रिझव्‍‌र्ह बँकेची पावले पडत नसल्याचा आरोप करत उद्योग जगताने मात्र गव्हर्नरांवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक कालावधीपासून त्रस्त अवस्थेत असलेल्या निर्मिती क्षेत्राला व्याजदर कपातीचे सकारात्मक बळ देण्याची गरज होती, अशी अपेक्षा उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
प्रमुख उद्योग क्षेत्राची वाढ नोव्हेंबरमध्ये वाढली असली तरी निर्मिती क्षेत्राचा प्रवास अद्याप संथच सुरू आहे, असे निदर्शनास आणून देत फिक्कीचे अध्यक्ष सिद्धार्थ बिर्ला यांनी रिझव्‍‌र्ह बँक आपल्या आगामी पतधोरणात निश्चित व्याजदर कपात करेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
आर्थिक सुधारणा अद्याप प्रत्यक्षात दिसत नसल्याने आणि उद्योगाची वाढही दृष्टिक्षेपात नसताना रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपातीसारखा धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा होती, असे सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी म्हटले आहे. कमी व्याजदराची उद्योगांची मागणी रास्त असल्याची भूमिका असोचेमचे अध्यक्ष राणा कपूर यांनी घेतली आहे.
व्याजदराशी संबंधित गृहनिर्माण क्षेत्रानेही स्थिर पतधोरणावर टीका केली आहे. विकासकांची देशव्यापी संघटना ‘क्रेडाई’चे अध्यक्ष ललितकुमार जैन यांनी तर किमान दरावर वित्त पुरवठय़ासाठी थेट सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा केली आहे. कमी व्याजदरामुळे विकासकांना गृहपुरवठा करणे शक्य होत असल्याने घर खरेदीदारांनाही अधिक संधी मिळते, असा दावा जैन यांनी केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्याजदरात कोणताही बदल न करून रिझव्‍‌र्ह बँकेने गृहनिर्माण क्षेत्राला निरुत्साही केले आहे, असा आरोपही जैन यांनी केला. रोजगारवाढीसह देशाच्या विकास दरात महत्त्वाचा वाटा राखणाऱ्या या क्षेत्रासाठी सध्या कमी व्याजदराची नितांत गरज होती, असेही ते म्हणाले.