शाश्वत विकासासाठी नव्यानव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करीत असताना भारतीय उद्योगांनी पर्यावरणाच्या रक्षणाचाही विचार करायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शुक्रवारी येथे केले. वार्षिक १५ टक्के वाढ करण्यास भारताचे रायानिक क्षेत्र समर्थ असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
भारतीय रसायन अभियांत्रिकी काँग्रेसच्या (केमकॉन) ६६व्या वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. गणपती डी. यादव यांचा राष्ट्रपतींनी ‘बी. पी. गोदरेज जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरव केला.
भारतीय रासायनिक क्षेत्राचा जागतिक बाजारपेठेत तीन टक्के म्हणजे १०८ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा वाटा आहे. ही बाब लक्षात घेता या क्षेत्रातील ही टक्केवारी झपाटय़ाने वाढू शकते. भारताने अशाच प्रकारे हा विकासदर कायम ठेवला तर २०१७ पर्यंत हा दर १५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा विश्वास याप्रसंगी राष्ट्रपतींनी व्यक्त केला. हे लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून संशोधन व विकास साधण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
या क्षेत्राचा विस्तार करायचा असेल तर २०१७ पर्यंत ५० लाख अतिरिक्त कुशल व्यावसायिक सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. तंत्रज्ञान संस्था मजबूत करण्याची गरज असून पेट्रोलियम, रसायन आणि इंधन क्षेत्राच्या सहकार्याने आवश्यक ते मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करायला हवी. रसायन क्षेत्रातील विकासासोबत सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्राच्या विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. शाश्वत विकासासाठी नवनव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करीत असताना भारतीय उद्योगांनी पर्यावरणाच्या रक्षणाचाही विचार करायला हवा, असे राष्ट्रपती म्हणाले. खत आणि कीटकनाशकाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचे उत्पन्न व उत्पादन वाढविण्यात रासायनिक उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही ते म्हणाले.
चार देशांचे दोन हजार प्रतिनिधी सहभागी
यंदाचे ‘केमकॉन’ अधिवेशन ‘अन्न सुरक्षा आणि आरोग्यक्षेत्रातील नावीन्य’ या विषयावर आधारित असून भारतासह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या चार देशांचे सुमारे दोन हजार प्रतिनिधी चार दिवसीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात जैव-रसायन अभियांत्रिकी, हरित रसायन, जलक्रिया, ऊर्जेचे अन्य स्रोत, आरोग्य रक्षा तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार असून या क्षेत्रातील विकास आणि उपक्रमांची माहिती देणारी ४० विविध स्टॉल्सही मांडण्यात येणार आहे.
“१०८ अब्ज डॉलरचा देशातील रसायन उद्योग हा जागतिक बाजारपेठेत तीन टक्के हिस्सा राखतो. १५ टक्के वाढीनुसार २०१७ पर्यंत या उद्योगाची वाढ २९० अब्ज डॉलपर्यंत जाईल. रसायन उद्योगाच्या एकूण महसुलापैकी केवळ ०.५ टक्के खर्च हा या क्षेत्रातील संशोधन व विकासावर होतो.”
 प्रणब मुखर्जी, राष्ट्रपती