आपण अर्थतज्ज्ञ वा सांख्यिकीतज्ज्ञही नाही; मात्र उद्योजक म्हणून अनेक दशके उद्योग चालवीत आहोत व इतर क्षेत्रातील उद्योगांचे निरीक्षण आपण केले आहे, असे आपल्या सरकारवरील शाब्दिक हल्ल्याचे समर्थन करतानाच बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी गेल्या दोन वर्षांपासून भारतीय उद्योग वाढ ठप्प असल्याचा दावा सोमवारी भागधारकांसमोर केला.
बजाज म्हणाले की, ‘जीव्हीए’चा ७.५ टक्के हा आकडा पटणारा नाही. कारण उद्योगात तर तशी काही वाढ झालेली दिसत नाही. गेली दोन वर्षे उद्योगाच्या अनेक क्षेत्रात फार अल्प वाढ किंवा वाढच झाली नाही, अशी स्थिती आहे हे कंपन्यांच्या २०१४-१५ च्या आर्थिक ताळेबंदावरून दिसते. औद्योगिक व ग्राहक मागणीत वाढ झालेली नाही, शिवाय २०१५ मध्ये ऊर्जेच्या किमतींमुळेही कंपन्यांना महसूल व नफ्यासाठी झगडावे लागले आहे, काही क्षेत्रांना कमी फटका बसला काहींना जास्त बसला पण याचा अर्थ बाजारपेठेत जी अवघड अवस्था दिसत होती ती तशी नव्हती असे ७.५ टक्के विकास दर गृहीत धरला तर म्हणावे लागेल, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१६ मध्ये आणखी जास्त वाढ अर्जित करील अशी आशा आहे.
सरकारने मे महिन्यात ‘जीव्हीए’ २०१४-१५ मध्ये सुरुवातीच्या ७.५ टक्के अंदाजाऐवजी ७.२ टक्के असल्याचे नंतर सांगितले होते. गत आर्थिक वर्षांत हा दर ६.६ टक्के होता. उत्पादन क्षेत्रात ७.१ टक्के तर वाढ झाली ती वाढ गतवर्षी ५.३ टक्के होती. वीज, गॅस, पाणीपुरवठा या सेवांमध्ये ७.९ टक्के वाढ नोंदवली गेली ती २०१४-१५ मध्ये ४.८ टक्के होती.
बजाज म्हणाले की, केंद्रीय सांख्यिकी संस्थेने एकूण मूल्यवर्धित वाढ ७.५ टक्के (ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड – जीव्हीए) असल्याचे म्हटले आहे. ‘जीव्हीए’ ही नवी संकल्पना आहे व त्यातून आर्थिक उलाढाल मोजली जाते, उद्योग क्षेत्रात काय चालले आहे हे समजते, असे मानतात; मात्र या वाढदराशी आपण सहमती दर्शविणे मनाला पटत नाही, असेही ते म्हणाले.
केंद्रीय सांख्यिकी संस्थेने जाहीर केलेला नवीन राष्ट्रीय उत्पन्न अंदाज अनेकांना गोंधळात टाकणारा व विद्यमान परिस्थितीशी विसंगत असा आहे, असे बजाज समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा