सलग १२ महिन्यात उणे स्थितीत राहणारा घाऊक महागाईचा दर यंदाच्या ऑक्टोबरमध्ये मात्र किरकोळ वधारला आहे. डाळी तसेच कांद्याच्या दरांनी उचल खाल्याने यंदा घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाईचा दर (-)३.८१ टक्क्य़ांवर गेला आहे.
आधीच्या, सप्टेंबरमध्ये तो (-)४.५४ टक्के तर वर्षभरापूर्वी, ऑक्टोबर २०१४ मध्यो ते १.६६ टक्के होता. गेल्या महिन्यात डाळी आणि कांद्यांचे दर अनुक्रमे ५२.९८ व ८५.६६ टक्क्य़ांनी वाढले. कमी मान्सून आणि डाळीसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे गेल्या महिन्यात एकूणच अन्नधान्यांचा दरही वाढल्याचे इक्राच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या.
भाज्यांच्या दरांमध्ये गेल्या महिन्यात २.५६ टक्क्य़ांची वाढ झाली. ती वर्षभरापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये उणे स्थितीत होती. अन्नधान्यांमध्ये दूध (१.७५%), गहू (४.६८%) यांच्या किंमती वाढल्या. तर बटाटय़ाचे दर उणे स्थितीत (५८.९५%) राहिले. इंधन तसेच ऊर्जा क्षेत्रातील दरही उणे क्रमवारीत राहिले आहेत. निर्मित वस्तूंचे दरही याच श्रेणीत मोडले आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या १ डिसेंबरच्या पतधोरणासाठी यंदाचा घाऊक किंमत निर्देशांक लक्षात घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी सलग तिसऱ्या महिन्यात वाढलेला किरकोळ महागाई दरही मध्यवर्ती बँकेसाठी दुर्लक्षिला जाणार नाही, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
महागाई वाढण्याची भीती
येणाऱ्या कालावधीत महागाई अधिक वाढण्याची भीती अनेक अर्थतज्ज्ञ तसेच उद्योग नेतृत्वाने व्यक्त केली आहे. इंधनाच्या वाढत्या दरांचा विपरित परिणाम निर्मित वस्तूंवर होण्यासह अन्नधान्याच्या किंमती पुन्हा उचल खाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असोचेम या उद्योग संघटनेने कमी खरिप उत्पादनामुळे तांदळाचे दर वाढण्याचे नमूद केले आहे. तसेच इंधनावरील वाढत्या अबकारी दरांमुळे एकूण महागाईवर परिणाम होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सीआयआयला मात्र वायदा वस्तूंच्या किंमती तूर्त स्थिर राहण्याचा अंदाज आहे. ताज्या ऑक्टोबरमधील घाऊक किंमत निर्देशांकात बिगर बासमती तांदळाचे दर वर्षभरापूर्वीच्या ३० रुपये किलोवरून यंदा २५ रुपये किलो झाले असले तसेच बासमती तांदळाचे दर ३० टक्क्य़ांनी स्वस्त झाले असले तरी येणाऱ्या कालावधीत कमी खरिप पिकामुळे या धान्याच्या किंमती वाढण्याची शक्यता असोचेमच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमधील कमी पावसामुळे सरकारचे ९०.६१ दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन लक्ष्य यंदा पूर्ण होण्याबाबत संघटनेने साशंकता व्यक्त केली आहे.
वाढीव सेवा कराची मात्राही लागू
स्वच्छ भारतच्या अधिभाराच्या रुपात वाढीव सेवा कराची मात्रा अखेर रविवार, १५ नोव्हेंबरपासून लागू झाली. यामुळे खानपानसह देयके आदी सेवा महाग झाल्या आहेत. १४ टक्के सेवा कर आणि ०.५० टक्के स्वच्छ भारत अधिभार अशी ही रचना आहे. अधिभारामुळे रेस्टॉरंट देयकावरील सेवा कर ५.६ टक्क्य़ांवरून ५.८ टक्के झाला आहे. तर वातानुकूलित रेस्टॉरंटमधील खानपान देयकावर ०.२ टक्के कर लागू होत आहे. पहिल्या दर्जाचा तसेच वातानुकूलित श्रेणीतील रेल्वे प्रवासही ४.३५ टक्क्य़ांनी महाग झाला आहे. तसेच पॅन कार्ड काढण्यासाठीही आता एक रुपया अतिरिक्त मोजावा लागत आहे.

Story img Loader