वाढत्या औद्योगिक उत्पादनाच्या रूपात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नव्या वर्षांची सुरुवात चांगली झाली असली, तरी वर्षांतील दुसऱ्या महिन्यात मात्र महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. जानेवारीतील  एकूण औद्योगिक उत्पादन दराने मात्र २.६ टक्क्यांनी वेग घेतला आहे. मात्र भाज्यांसह अन्नधान्यांच्या किमती चढय़ाच राहिल्याने फेब्रुवारीमधील किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा ५.३७ टक्क्य़ांपर्यंत उंचावला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या येणाऱ्या पतधोरणातील संभाव्य व्याजदर कपातीसाठी त्यामुळे अडसर निर्माण झाला आहे.
भांडवली वस्तूंची मागणी पथ्यावर
जानेवारी २०१५ मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनाचा दर २.६ टक्के नोंदला गेला आहे. भांडवली वस्तूंना आलेली मागणी आणि त्यापोटी निर्मिती क्षेत्राने घेतलेला वेग हा यंदा दराच्या पथ्यावर पडला आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारित हा दर वर्षभरापूर्वी, जानेवारी २०१४ मध्ये अवघा १.१ टक्का होता, तर २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते जानेवारीदरम्यान तो २.५ टक्के आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील जवळपास शून्याच्या आसपास असणारा हा दर उंचावला आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७५ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ जानेवारीमध्ये ३.३ टक्के राहिली आहे. ती जानेवारी २०१४ मध्ये ०.३ टक्के होती. तर एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ दरम्यान निर्मिती वर्षभरापूर्वीच्या ०.३ टक्क्य़ांवरून १.७ टक्के झाली आहे.
भांडवली वस्तू उत्पादनाचा दर तिप्पट वाढून १२.८ टक्के झाला आहे. जानेवारी २०१४ मध्ये तो ३.९ टक्के होता. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या १० महिन्यात हा दर ५.७ टक्के झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत हा दर ०.८ टक्के होता.
२०१५च्या सुरुवातीला ऊर्जा निर्मिती वाढ वार्षिक तुलनेत कमी झाली आहे. ती यापूर्वीच्या ६.५ टक्क्य़ांवरून यंदा २.७ टक्के झाली आहे. तर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या १० महिन्यात मात्र ती ५.७ टक्क्य़ांवरून यंदा ९.३ टक्के झाली आहे.
अन्नधान्यातील किंमतवाढीची डोकेदुखी
फेब्रुवारीमधील किरकोळ महागाईवर आधारित ग्राहक किंमत निर्देशांक जानेवारीच्या ५.१९ टक्क्य़ांवरून ५.३७ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. २०१५ मधील पहिल्या दोन्ही महिन्यांतील हे दर महागाईच्या नव्या मोजपट्टीवर आधारित आहेत.
गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर ६.७९ टक्क्य़ांवर गेला आहे. तो जानेवारी २०१५ मध्ये ६.०६ टक्के होता. भाज्या, डाळी आदींच्या किमतीत गेल्या महिन्यात वाढ झाली आहे. त्यामध्ये भाज्यांचे दर १३.०१ टक्क्य़ांनी वाढले आहेत. तर डाळींच्या किमती १०.६१ टक्क्य़ांनी उंचावल्या आहेत. या गटातील अन्य जिनसांच्या किमतीही ६.७६ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. तर फळांमधील महागाई ही ८.९३ टक्क्य़ांची आहे.
मटण, मासे यांच्या किमती फेब्रुवारी २०१५ मध्ये ५.०५ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर पान, तंबाखू आदी वस्तूंच्या किमती ९.२४ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. अंडय़ांचे दर १.०६ टक्क्य़ांनी कमी झाले आहेत. वाहतूक आणि दळणवळणाशी संबंधित वस्तूंचे दरही २.१६ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहेत.
वाढत्या महागाई दरामुळे व्याजदर कपातीची अपेक्षा पुन्हा एकदा बळावली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण ७ एप्रिल रोजी आहे. मध्यवर्ती बँकेने यापूर्वी सलग दोन वेळा पतधोरणबाह्य़ प्रत्येकी पाव टक्क्य़ाची दर कपात केली आहे. मात्र अमेरिकी फेडरलच्या व्याजदराबाबतच्या महिनाअखेरच्या निर्णयाकडे रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांचीही नजर आहेच. युरोपीय मध्यवर्ती बँकेपाठोपाठ कोरियाच्या मध्यवर्ती बँकेनेही व्याजदर कमी केल्याने भारतातही तसे चित्र निर्माण होण्याची आशा आहे.

Story img Loader