* सव्वातीन वर्षांत प्रथमच पाच टक्क्यांखाली!
* नोव्हेंबर २००९ नंतर  ४.८९% असा पाच टक्क्यांखालचा स्तर

चालू आर्थिक वर्षांतील पहिल्याच महिन्यात घाऊक किमतीवर आधारीत महागाईदर ५ टक्क्यांच्या खाली म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील मर्यादेच्या आत विसावला आहे. सरलेल्या एप्रिल २०१३ मध्ये महागाई दर हा ४.८९% नोंदविला गेला असून, तो गेल्या ४१ महिन्यांतील सर्वात नीचांक स्तर आहे. यंदा समाधानकारक पावसाची जोड लाभल्यास रिझव्‍‌र्ह बँकेच्या आगामी धोरणात व्याजदरात मोठी कपात अपेक्षिली जात आहे.
घाऊक किमतीवर आधारित महागाई दर नोव्हेंबर २००९ मधील ४.७८% नंतर, सरलेल्या ४१ महिन्यांत पहिल्यांदाच ५ टक्क्यांच्या आत राहिला आहे. मार्च २०१३ मध्ये हा दर ६ टक्के होता. इंधनाच्या किमती कमी झाल्याने यंदा महागाई दर नरमला आहे. मार्चमध्ये १२.१५ टक्के वाढ दर्शविणाऱ्या इंधनाच्या किमती एप्रिलमध्ये ८.८ टक्क्यांनी वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात    कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने तसेच स्थानिक पातळीवर पेट्रोलबरोबरच डिझेलचे दर नियंत्रणमुक्त झाल्याने हा परिणाम साधला गेला आहे. इंधनाव्यतिरिक्त उत्पादित वस्तूवर आधारित महागाई दर ५.६ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांवर आला आहे.
वैश्विक मागणी रोडावल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात धातू आदी जिनसांच्या किमती कमी झाल्याने उत्पादित वस्तूंच्या किमती घटल्या आहेत. यात मुख्यत्वे साखर, खाद्यतेल यांचा समावेश आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर एप्रिलपूर्वी दोन महिने घसरता राहिला आहे.

शेअर बाजार सावरला
गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने २० हजारांखाली गेलेला सेन्सेक्स व ६ हजारांपासून फारकत घेणारा निफ्टी असे दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांक मंगळवारी काहीसे सावरले. कालच्या एकाच सत्रात चार शतकांची आपटी खाणारा सेन्सेक्स ३०.६२ अंशांनी वधारून १९,७२२.२९ वर बंद झाला. तर निफ्टी १४.९५ अंश वाढीने ५,९९५.४० वर स्थिरावला. काल (सोमवारी) ४३० अंश घसरणीने गेल्या १४ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण नोंदविणारा सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात १९,६५२ या दिवसाच्या नीचांकावर होता. मात्र एप्रिलमधील महागाई दर ५ टक्क्यांच्या आत विसावल्याचे समाधान बाजारात उमटले. तीन वर्षांत प्रथमच खालच्या पातळीवर आलेल्या महागाई दराने रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा बळावल्याने एचडीएफसी, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांचे समभाग उंचावले. ३ मे रोजी चालू आर्थिक वर्षांचे पतधोरण जाहीर करताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी वाढती महागाई आणि चालू खात्यातील तूट यामुळे नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीला कमी संधी असल्याचे स्पष्ट केले होते. रेपो दरात किमान अध्र्या टक्क्याची कपात अपेक्षित असलेल्या उद्योग क्षेत्राच्या आशा महागाई कमी झाल्याने पुन्हा उंचावल्या आहेत. पावसाळ्याबाबतचे चित्र पुरते स्पष्ट झाल्यावर १७ जून रोजी रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण आढावा घेणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थतज्ज्ञ काय म्हणतात?
मार्च २०१३ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक व एप्रिलमधील महागाईचा दर सकारात्मक असला तरी किरकोळ महागाई दर अद्यापही दुहेरी आकडय़ानजीक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमती कमी झाल्या असल्या तरी देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढण्याचा धोकाही बळावला आहे. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँक त्वरित रेपो दर कमी करण्याची शक्यता कमी आहे. – ज्योती वाधवानी, अर्थतज्ज्ञ, केअर रेटिंग.


जागतिक वायदे बाजारात वस्तूंचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. भारतात आता घाऊक किंमत निर्देशांकाबद्दल चिंताजनक स्थिती नाही. २००९ मध्येही महागाई दर नकारात्मक स्थितीत होता. त्यालाही जबाबदार आंतरराष्ट्रीय किमतीच होत्या. एकूण चालू आर्थिक वर्षांत मात्र महागाई दर ५.६ टक्के राहील.
–  सोनल वर्मा, अर्थतज्ज्ञ, नोमुरा इंडिया