प्रधानांचा राजीनामा, आणखी काही मोहरे गळण्याची शक्यता
बिकट अर्थस्थितीत व्यवस्थापनाची सूत्रे नव्याने हाती घेणाऱ्या एन. आर. नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसची भारताबाहेरील व्यवसायाची महत्त्वाची जबाबदारी हाताळणाऱ्या बसब प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्याची घटिका दोन दिवसांवर (शुक्रवारी) येऊन ठेपली असतानाच समूहातील विशेषत: विक्री व विपणन विभागातील आणखी मोहरे बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील अन्य माहिती तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणेच इन्फोसिसलाही देशाबाहेरील सेवेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या कंपनीच्या विदेशातील व्यवसायाची जबाबदारी प्रधान यांच्यावर होती. समूहातून बाहेर पडण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. प्रधान जागतिक विक्री व विपणनप्रमुख होते. कंपनीचे २०१५ मधील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. सध्या या पदावर कंपनीचे एक संस्थापक एस. डी. शिबुलाल आहेत. १९९४ मध्ये इन्फोसिसमध्ये आलेल्या प्रधान यांनी २००५ मध्ये इन्फोसिसमधून बाहेर पडत स्वत:ची ग्रिडस्टोन रिसर्च ही कंपनी सुरू केली होती. यानंतर २०११ मध्ये ते पुन्हा समूहात परतले. कंपनीचा व्यवसाय ४० कोटी डॉलरवरून २०० कोटी डॉलपर्यंत नेण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्याच कारकिर्दीत १९९५ मध्ये कंपनीचे न्यूयॉर्कमध्ये पहिले विक्री कार्यालय सुरू झाले. इन्फोसिसपूर्वी ते हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये होते.

विप्रोत ‘ग्रो फॅमिलियर’ सुसंवादावर भर
ल्ल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याचे तणावपूर्ण आर्थिक-व्यावसायिक वातावरण पाहता कर्मचाऱ्यांच्या संवादी माध्यमाला अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न विप्रोकडून होत आहे. उद्यमशील व्यक्ती, यशस्वी कलाकार यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांची सांगड घालत कंपनीत उत्साहवर्धक वातावरण टिकून ठेवण्यावर ‘ग्रो फॅमिलियर’ या उपक्रमाद्वारे भर दिला जात आहे. संवाद, संपर्क आणि वृद्धी या तत्त्वावर ‘ग्रो फॅमिलियर’ हा उपक्रम विप्रोमार्फत समूहात गेल्या काही दिवसांपासून राबविला जात आहे. यासाठी कंपनीच्या कोणत्याही एका कार्यालयात आठवडय़ातील एक तास वेळ राखून ठेवला जातो. याअंतर्गत समूहात बोलाविण्यात येणारे निवडक पाहुणे हे कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. कंपनीतील ज्येष्ठ अधिकारीही या वेळी सहभागी होतात. याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुंबईत कंपनीच्या पवई येथील कार्यालयात तासभर झालेल्या या संवादात्मक कार्यक्रमात २२ वर्षीय महिला उद्योजक सोनिया अगरवाल (सहसंस्थापक, व्हाइटनाइफ) यांनी सहभाग नोंदविला. सोनिया यांनी दोन कंपन्या सुरू केल्या असून वस्त्रनिर्मितीशी संबंधित कंपनीवर त्या संचालकही आहेत. नमन शाह यांच्याबरोबर त्यांनी व्हाइटनाइफसह फ्रेशमेन्टोर्स ही कंपनीही स्थापन केली आहे. गेल्या महिन्यात हा उपक्रम पहिल्यांदाच चेन्नई येथून सुरू झाला. या वेळी मॉडेल-अभिनेता मििलद सोमण व रिद्धिमा सुरी यांनी संवाद साधला. एक जलतरणपटू ते अभिनेता हा प्रवास त्याने २०० कर्मचाऱ्यांसमोर उलगडून दाखविला. पुणे आणि कोची येथेही राबविलेल्या याच उपक्रमांतर्गत अनुक्रमे चेतन भगत व प्रसिद्ध वक्ते जी. जे. सिद्धार्थ यांनी सहभाग नोंदविला.