गेल्या एका वर्षांत औषधी कंपन्यांच्या समभागांनी चांगला परतावा मिळवून दिला आहे. इप्का लॅब ८०% , स्ट्राइड अर्कोलॅब १६६% तर आरबिंदो फार्मा १०९%, स्पार्क ८४% असे परताव्यांचे प्रमाण राहिले आहे. प्रचंड नकारात्मक बातम्यांचा ओघ सुरू असलेल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’ची मुद्दाम खरेदी नको, पण ज्यांच्या हाती हे समभाग असतील त्यांनी आणखी काही पकडून ठेवावेत, असे निश्चितच सुचवावेसे वाटते. आगामी आठवडय़ाचा कल हा तेजीसदृश्य सकारात्मकच आहे.
आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाही निकालाच्या हंगामाला धडाकेबाज रंग शुक्रवारी जाहीर झालेल्या इन्फोसिसच्या निकालांनी दिला. तिमाही निकालांपेक्षा इन्फोसिसने आगामी काळातील वाटचालीविषयी दिलेले निर्देश बाजाराला अधिक भावलेले दिसतात. बाजाराने अक्षरश: कंपनीच्या समभागाला डोक्यावर घेतले आणि दिवसात समभागाने १७ टक्क्यांनी भाव खाल्ला. ही कदाचित भारतीय आयटी कंपन्यांच्या भाग्यरेषेला कलाटणी देणारी घडी असेल, असेही म्हटले जात आहे. इन्फोसिसच्या बरोबरीने एकूण आयटी निर्देशांकातील समभागांनी शुक्रवारी घेतलेल्या उसळीने याची प्रचीती दिली आहे.
बाजाराने गेले काही दिवस निकालांआधी नियमित दिसणारा सावध पवित्रा धारण केला. परिणामी निफ्टी निर्देशांक आठवडाभर ६ हजाराच्या किंचित वर-खाली हलताना दिसून आला. डिझेल, स्वैपाकाचा गॅस, केरोसीनच्या दरवाढीबाबत केंद्रातील सरकार लवकरच निर्णय घेणे अपेक्षित आहे. रेल्वेची भाडेवाढ आताच झाली आहे.
परिणामी तेल कंपन्या आणि रेल्वे वाहतुकीशी संलग्न कंपन्यांचे समभाग वधारत आहेत. पुन्हा कमालीचा खालावलेला नोव्हेंबरचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक देशांतर्गत उद्योगधंद्यांमध्ये डळमळलेल्या मनोधारणेचेच द्योतक आहे. यातून महिनाअखेरीस रिझव्‍‌र्ह बँकेकडून जाहीर होत असलेल्या पतधोरण व्याजदर कपातीच्या दिशेने अधिकच अनुकूलता निर्माण झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून हे पाऊल टाकले जाणारच या अपेक्षेने बँकांच्या समभागांचे भाव सतत वाढत आहेत. अनेक बँकांनी ५२ सप्ताहातील उच्चांकाला केव्हाच मागे टाकले आहे. नव्या उच्चांकाला गवसणी घालणाऱ्या समभागात टाटा मोटर्सचीही गेल्या आठवडय़ात वर्णी लागली. ‘सीएलएसए’ या जागतिक शेअर दलाल संस्थेपाठोपाठ ‘क्रेडिट सुइस’नेही टाटा मोटर्सवर ‘खरेदी’ची उमटविलेली मोहोर याचे कारण आहे. अन्यथा देशांतर्गत वाहन विक्रीतील वाढीचा दर नऊ वर्षांपूर्वीच्या स्तरावर घसरले आहे. बाजारातील मरगळीचा सर्वाधिक फटका दुचाकी वाहन क्षेत्रातील देशी उत्पादकांना बसला आहे. खरे तर वाहन कंपन्यांसाठी हा साधारणत: जंगी विक्रीचा काळ असतो, त्याच काळातील आकडय़ांना आलेली अवकळा पाहता, मुख्यत: दुचाकी निर्मात्यांच्या समभागांनी गेले काही महिने सतत घसरण दाखविली आहे.
२०१३ सालच्या पहिल्या सप्ताहात बाजारातील विदेशी वित्तसंस्थांचा (एफआयआय) खरेदीचा जोर कायम आहे. एफआयआयकडून पहिल्या सप्ताहातच बाजारात जवळजवळ ४५०० कोटी रुपयांची खरेदी झाली आहे.अमेरिकेतील कथित ‘फिस्कल क्लिफ’ संकटाची टांगती तलवार मानेवरून दूर झाल्यावर, विदेशातून भारतातील गुंतवणुकीचा ओघ वाढत जाणे स्वाभाविकच आहे. यातून निफ्टी निर्देशांकाने लवकरच ७,००० सार्वकालिक उच्चांकी पातळी ओलांडण्याचे भाकीत केले जात आहे, त्यात तर्क दिसून येतो. आयपीओ अर्थात कंपन्यांची प्रारंभिक भागविक्री हा सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने फारसा प्रिय विषय राहिलेला नाही. ही धारणा बदलण्यासाठी ‘सेबी’चे प्रयत्न जरूर सुरू आहेत.
विशेषत: नोंदणीपश्चात ठराविक मात्रेखाली भाव घसरणाऱ्या कंपन्यांकडून भरपाई वसुल करण्याचा दंडक ‘सेबी’ आणू पाहत आहे. त्याचे प्रत्यक्षात रूप काय असेल ते पुढे दिसून येईलच. पण त्यातून किमान आयपीओ आणणाऱ्या कंपन्या किंमत महाग न ठेवता यापुढे वाजवी भाव ठरवतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा