विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. अर्थव्यवस्थेच्या प्रवासाबाबत आपल्याला काही आकडय़ांची प्रतीक्षा असून ती समाधानकारक नसल्यास आगामी पतधोरणापूर्वीदेखील व्याजदराबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी म्हटले.
राजधानीत दूरचित्रवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत गव्हर्नरांनी म्हटले की, महागाईविरोधातील आमचा लढा कायम आहे, याबाबत कुणालाच शंका असता कामा नये. त्यासाठी व्याजदर हेच आमचे खास हत्यार आहे, याबाबतही दुमत नाही. मात्र आगामी कालावधीत व्याजदर वाढवायचे किंवा नाही हे सर्वस्वी महागाईचे तसेच औद्योगिक उत्पादनाचे आकडे यावर निर्भर राहील. महागाईला प्राधान्य देताना तुम्ही विकासाकडे दुर्लक्ष करत आहात, असेही समजता कामा नये, असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या गेल्या वेळच्या स्थिर व्याजदराच्या निर्णयाचे समर्थनच केले.
नोव्हेंबरमधील किरकोळ व घाऊक महागाई अनुक्रमे ११.२४ व ७.५२ टक्क्यांवर पोहोचल्यानंतरही रिझव्‍‌र्ह बँकेने १८ डिसेंबरच्या मध्य तिमाही पतधोरणात सर्व व्याजदर स्थिर ठेवले होते. महागाई दर येत्या कालावधीत कमी होण्याच्या आशेने हा निर्णय घेण्यात आला होता. गव्हर्नरांनी तत्पूर्वी सलग दोन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची कुऱ्हाड चालविली होती. डिसेंबरमधील अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे आकडे येत्या महिन्यात जाहीर होणार आहेत; तर पुढील पतधोरण याच महिन्यात २८ रोजी आहे.
रुपयाच्या मूल्यात सकारात्मकता
ल्ल सप्ताहअखेरप्रमाणेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास सप्ताहारंभीदेखील सकारात्मक राहिला. स्थानिक चलन ९ पैशांनी उंचावत ६१.९५ वर पोहोचले. चलन आता आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर आहे. शुक्रवारीही त्यात १० पैशांची भर पडली होती. तत्पूर्वी गेल्याच आठवडय़ात सलग तीनही व्यवहारात चलनाने डॉलरपुढे ४१ पैशांनी नांगी टाकली होती. गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला ३९ पैशांनी वधारत ६१.७३ पर्यंत पोहोचलेल्या रुपयाने लगेचच घसरण नोंदविली. ती परकी चलन व्यासपीठावर १९ डिसेंबपर्यंत कायम होती. आता गेल्या दोन व्यवहारांतील रुपयातील भक्कमता १९ पैशांची आहे.

Story img Loader