सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारातील तेजीला मंगळवारी बँक तसेच वाहन क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचा पाठिंबा मिळाला. येत्या मंगळवारच्या पतधोरणात रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपात केली जाण्याच्या आशेने एकूण सेन्सेक्स ४६.०७ अंश वाढीसह २१,२५१.१२ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ९.८५ अंश भर पडून निर्देशांक ६,३१३.८० पर्यंत गेला.
सप्ताहारंभीच्या १४१.४३ अंश वाढीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्समध्ये वाढ नोंदली गेली. रिझव्र्ह बँकेच्या २८ जानेवारी रोजीच्या तिमाही पतधोरणात व्याजदर कपातीच्या अपेक्षेने बाजारात व्याजदराशी निगडित समभागांची गुंतवणूकदारांकडून खरेदी झाली. गेल्या आठवडय़ात डिसेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक महागाई निर्देशांकांमध्ये कमालीचा उतार दिसल्याने यंदा व्याजदर कपातीची शक्यता बळावली आहे.
जागतिक बाजारातील तेजीचे बळही भांडवली बाजारात मंगळवारी विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांनी निधी ओतण्यास जबाबदार ठरले. परिणामी सेन्सेक्सचा वरचा टप्पा २१,३०२.५२ राहिला.
मंगळवारच्या व्यवहारातील तेजीला आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांच्या समभागांनी हातभार लावला. सोमवारी तेजीत राहिलेल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मंगळवारी नफेखोरी पाहायला मिळाली.
सेबीच्या प्राथमिक माहितीनुसार, भांडवली बाजारात मंगळवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ६.५४ कोटी डॉलरची गुंतवणूक केली.
रुपया आठवडय़ाच्या नीचांकावर
ल्ल सलग तिसऱ्या दिवशी भारतीय चलनाने मंगळवारी कमकुवतपणा राखताना सप्ताहाचा तळ गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया २६ पैशांनी खाली येत ६१.८८ पर्यंत घरंगळला. आयातदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीमुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव दिसून आला. उल्लेखनीय म्हणजे भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून नियमित खरेदी सुरू असूनही रुपया सलगपणे घसरत आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक चलनाने ६१.९५ नीचांक दाखविला. सलग तीन सत्रातील घसरणीने रुपया ४० पैशांनी कमकुवत बनला आहे.
व्याजदर कपातीच्या आशेने‘सेन्सेक्स’मध्ये तेजी कायम
सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारातील तेजीला मंगळवारी बँक तसेच वाहन क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचा पाठिंबा मिळाला. येत्या मंगळवारच्या
First published on: 22-01-2014 at 05:59 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interest rates influnces senesex