महागाई वाढत असूनही रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवल्याने तमाम बँक वर्तुळानेही तूर्त व्याजदर वाढविण्यात येणार नाही, असा दिलासा दिला आहे. मध्यवर्ती बँकेच्या गेल्या वेळच्या पाव टक्के व्याजदर वाढीनंतरही बँकांचे गृह आदी कर्ज मोठय़ा प्रमाणात वाढले नव्हते असा दावा करत आता तर त्याची अजिबात शक्यता नाही, असा शब्दही बँकांकडून दिला जात आहे. ठेवींवरील वाढते व्याजदरही लगेचच कमी करण्यात येणार नाहीत, असाही दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी बुधवारच्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाचे देशातील बँकिंग क्षेत्राने स्वागत करतानाच तूर्त गृह आदी कर्ज व्याजदर वाढविण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तर ठेवींवरील दरही सध्या आहे त्याच पातळीवर कायम राहतील, असे नमूद केले आहे.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सध्या उच्चांकी पातळीवर असलेले ठेवींवरील व्याजदर कमी करून आम्ही आमच्या लाखो ग्राहकांची नाराजी ओढवून घेणार नाही, असे पतधोरणानंतर स्पष्ट केले. बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व्ही. आर. नायर यांनी ठेवींवरील व्याजासह कर्जावरील व्याजदरही सध्या कमी केले जाणार नाही, असे सांगितले. मोठय़ा रकमेच्या ठेवींवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवितानाच त्यांनी गृह आदी कर्ज व्याजदर निदान डिसेंबर अखेपर्यंत तरी वाढविले जाणार नाहीत, असा दावा केला.