यापूर्वी वेळोवेळी वाढत्या महागाईच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा प्रथमच विकासाला चालना देण्याचा प्रयत्न स्थिर व्याजदराच्या माध्यमातून केला आहे, अशी भावना तमाम उद्योगाने व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेची गती मंदावली असताना अपेक्षित व्याजदर न वाढवून गव्हर्नरांनी दिलासा दिल्याचे उद्योगाचे मत आहे. याचबरोबर महागाई आटोक्यात आणणे केवळ रिझव्‍‌र्ह बँकेचेच कार्य नव्हे तर केंद्र सरकारनेही त्या दृष्टीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा उद्योगांनी व्यक्त केली.
केवळ महागाईकडे बोट न दाखविता वस्तू-खाद्यान्नाच्या सुरळीत पुरवठा करण्याची जबाबदारी सरकारची असून यंदा व्याजदरात वाढ न करून मध्यवर्ती बँकेने महागाई आणि विकास यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे ‘भारतीय औद्योगिक महासंघा’चे (सीआयआय) महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँक यापुढे व्याजदर शिथिल करेल, असा विश्वास व्यक्त करत ‘फिक्की’ या अन्य उद्योग संघटनेच्या अध्यक्षा नैना लाल किडवाई यांनी सरकारनेही विकासाला आणि गुंतवणुकीच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत प्रदर्शित केले. अर्थव्यवस्थेतील रोकड स्थिती पाहता बँकांना आता व्याजदर कमी करण्यास हरकत नाही, अशी भावना खासगी येस बँक व व ‘असोचेम’ या उद्योग संघटनेचेही अध्यक्ष असलेल्या राणा कपूर यांनी व्यक्त केली आहे.
वाहन, घर विक्रीला बळ मिळेल: कंपन्यांचा दावा
सलग दोनवेळा व्याजदर वाढ केल्यानंतर विराम घेणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या यंदाच्या स्थिर पतधोरणाने गेल्या काही महिन्यांपासून विक्री रोडावलेल्या वाहन तसेच घरांच्या मागणीला यंदाच्या मोसमात भरभराट येईल, असा विश्वास या क्षेत्रातून प्रदर्शित होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक मंदीत रुतलेल्या गृहनिर्माण क्षेत्राने यंदाच्या दिवाळीत तुलनेने माफक प्रतिसाद नोंदविला, तर सणांचा कालावधी सोडता वाहन उत्पादक कंपन्यांची विक्री सुमारच राहिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवल्याने बँकांकडून कर्ज व्याजदरही तूर्त स्थिर राहण्याच्या आशेने नव्या वर्षांत किमान वाढ नोंदली जाईल, असे मत वाहन उत्पादक तसेच बांधकाम कंपन्यांनी व्यक्त केले आहे. ‘जोन्स लॅन्ग लासेला इंडिया’ या बांधकाम सल्लागार कंपनीचे अध्यक्ष अनुज पुरी यांच्या म्हणण्याप्रमाणे, वर्षअखेरीस गृहनिर्माण क्षेत्राला एक चांगले वृत्त रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत मिळाले आहे. व्याजदरवाढीच्या शक्यतेने खरेदीदारांचा झालेला हिरमोड उत्साहात बदलला गेला आहे. ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेन्ट कौन्सिल’चे अध्यक्ष सुनील मंत्री म्हणाले की, गृहनिर्माण तसेच पायाभूत सेवा उद्योगाला या माध्यमातून तूर्तास का होईना दिलासा मिळाला आहे. सरकारद्वारे आता विकासाला चालना देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.