गौरव मुठे

आजोळ या नाममुद्रेअंतर्गत अपूर्वा यांनी गरजू आणि स्थानिक पातळीवर आरोग्यदायी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या बचत गटांशी करार करून त्यांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

मुंबई :  स्वत:च्या जिद्दीवर उद्योग उभा करत व इतरांनाही रोजगार मिळवून देणाऱ्या अपूर्वा पुरोहित एक यशस्वी महिला लघुउद्योजिका. उत्पादनातील गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करणाऱ्या अपूर्वा तीसहून अधिक दर्जेदार उत्पादनांद्वारे देशभरात विस्तार करत आहेत. या यशस्वी महिला उद्योजिकेची ही यशोगाथा बरेच काही शिकवणारी व प्रेरकही.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती खूप समृद्ध असून राज्यातील कानाकोपऱ्यांत विविध खाद्यपदार्थ त्या त्या ठिकाणच्या वैशिष्टय़ांसह तयार केले जातात. आता जसजशी माणसे कामाकरता शहरात जाऊ लागली त्यानुसार काही पदार्थ फक्त गावापुरतेच मर्यादित राहिले. मात्र घरातील आजी-आजोबा जाताना आपल्या मुलांना प्रेम आणि आपुलकीने खाऊ देतात आणि हीच खास गरज ओळखत त्यातून ‘आजोळ’चा जन्म झाला, असे अपूर्वा सांगतात. महाराष्ट्रामध्ये असलेली समृद्ध खाद्य परंपरा देशभर रुजावी आणि शहरात गेलेल्या स्वकियांना महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी ‘आजोळ’च्या माध्यमातून विविध पदार्थ महाराष्ट्रासह देशभरात आपुलकीने आणि प्रेमाने पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

महाराष्ट्रात विविध बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असलेले पदार्थ तयार केले जातात. अपूर्वा आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ यांनी अशा पाचशेहून अधिक बचत गटांना भेटी देऊन त्यांच्याकडील उत्पादने स्वत: प्रत्येक कसोटीवर पडताळून घेत निवडक काही उत्पादने आजोळच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कारण महाराष्ट्रातील खाद्यपरंपरा समृद्ध असली तरी ठरावीक पदार्थ लोकांना माहिती आहेत. मात्र अजूनही अशीच बरीच खाद्य उत्पादने अशी आहेत की, जी कधीही जगासमोर म्हणजेच देश पातळीवर विकली गेली नाहीत. अपूर्वा यांनी हीच मेख ओळखत करोनाच्या काळात सामाजिक भान आणि व्यवसाय असे समीकरण जुळवत आजोळ नाममुद्रा लोकांसमोर आणण्याचा निर्णय घेतला.  सुमारे दोनशेहून खाद्यपदार्थातून ३० पदार्थ निवडले गेले. त्यामध्ये विविध स्थानिक मसाले, तयार पीठ, चटण्या, थालीपीठ भाजणी आणि लाडू अशा विविध आरोग्यदायी खाद्यपदार्थाचा समावेश आहे. सिंधुदुर्गपासून ते नंदुरबापर्यंत विविध बचत गटांकडून पदार्थ घेतले जातात. नंदुरबारमध्ये तर काही बचत गट अगदी दुर्गम भागातील आहेत. बऱ्याचदा चालत जावे लागते. मात्र नंदुरबारमधील नर्मदा माता महिला या बचत गटाकडून तेथील स्थानिक भागात उगवणाऱ्या वनस्पती, फळे आणि फुलांचा वापर करून ‘महुआ लाडू’सारखी पौष्टिक उत्पादने तयार केली जातात. जी आता आजोळच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहेत.

सिद्धार्थ पुरोहित यांच्या मदतीने हा उद्योग आधुनिकतेची कास धरत ‘ऑनलाइन’ माध्यमातून देशभरात पोहोचू शकला आहे. अपूर्वा आणि सिद्धार्थ यांनी विविध प्रयोग करत महाराष्ट्रातील अनेक उत्पादने लोकांना उपलब्ध करून दिली आणि ती लोकांच्या पसंतीत उतरली आहेत. अपूर्वा यांनी व्यवसायाबाबत सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुळात त्याची आवड असली पाहिजे. शिवाय तो ग्राहककेंद्रित असणे आवश्यक आहे. एकदा व्यवसाय सुरू झाला की, त्यापासून इतर अनेक उद्योग देखील जन्माला येतात. ते तुम्ही चाणाक्ष नजरेने हेरले पाहिजेत. म्हणजेच ज्यावेळी आम्ही बचत गटांच्या घरगुती उद्योगाला मोठे स्वरूप देण्यास सुरुवात केली त्यावेळी अनेक बचत गटांनी त्यांच्या उत्पादनासाठी आमच्याशी संपर्क साधला. आता अशा बचत गटांकडील उत्तम पदार्थ देखील ‘आजोळ’च्या मंचावर उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. थोडक्यात, स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना देखील स्वयंपूर्ण करण्याचा ‘आजोळ’चा संकल्प आहे.

Story img Loader