ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांची खंत

कसलेही नियंत्रण नसतानाच्या काळात आपल्याकडे उद्योगांची वाढ झाली, पण सरकारचे नियंत्रण लागू झाल्यानंतर मात्र उद्योगांचा वेग मंदावला, असे नमूद करीत ज्येष्ठ उद्योगपती आणि जागतिक विस्तार असलेल्या भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी शासनाच्या नियंत्रण- हस्तक्षेपांमुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर बोट ठेवले.
येथील घाटगे-पाटील उद्योग समूहाचे संस्थापक वसंतराव घाटगे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ याचा अलीकडे वारंवार उदोउदो होत आहे; पण या धोरणांचे प्रत्यक्ष परिणाम, त्यातील अंतर्विरोधही पाहिले पाहिजेत, असे नमूद करून कल्याणी यांनी या धोरणांच्या बाबतीत जमिनीवरचे वास्तव लक्षात घेण्याची गरज व्यक्त केली. उद्योगांमध्ये होत असलेल्या बदलाची योग्य वेळी शासन पातळीवर गांभीर्याने नोंद घेतली जात नाही. ‘आयटी’ उद्योगाचे बीजारोपण झाले तेव्हा त्याची शासनाला गंधवार्ताही नव्हती आणि जेव्हा शासनाला या उद्योगाचे मर्म कळले तेव्हा मात्र त्यासंबंधाने विविध नियमावली आणून भलताच घोळ घातला गेला. हा अनुभव पाहता ‘मेक इन इंडिया’सारख्या कल्पना चांगल्या असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
देश मोठय़ा बदलातून जात आहे, असे नमूद करून कल्याणी यांनी औद्योगिक क्रांतीतील चौथा टप्पा सध्या सुरू झाला असल्याचे सांगितले. असे आवर्तन दर ३० वर्षांनी येत असते. सध्या ‘इलेक्ट्रॉनिक’ क्षेत्रात बदलाचा हा टप्पा सुरू झाला असून, भविष्याचा वेध घेऊन आतापासूनच त्याकडे लक्ष पुरविल्यास भारतीय उद्योजकांना मोठी संधी आहे. त्यातही उद्यमशीलता जपणाऱ्या कोल्हापूरला चांगली संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मेक इन इंडिया’सारखी संकल्पना घेऊन आपण प्रगतीचा केंद्रिबदू साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला अनुकूल असे व्यवस्थेचे सुदृढीकरण करणे हे आपल्यासमोरील मुख्य आव्हान आहे, असा उल्लेख करून गिरीश कुबेर म्हणाले, की प्रभावी व्यवस्था असल्याशिवाय कोणताही देश महासत्ता होत नाही. त्याकरिता माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण सर्वाना मिळणे महत्त्वाचे आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या प्रयोगातून प्रभावी निर्मिती होईल असे मध्यंतरीच्या काळात वाटत होते; पण राष्ट्रवादाची लाट आली आणि उगवलेली ही अपेक्षा प्रतीकात्मकतेतच विरली. दुसरीकडे समाजातील दोष बदलण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे आणि ही बदलाची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
भू-संपादन कायदा, बँकिंग सुधारणा, कर सुधारणा, कामगार कायद्यातील सुधारणा या चार मुद्दय़ांचा सविस्तर आकडेवारीनिशी परामर्श घेऊन कुबेर यांनी भारताला प्रगती साधायची असेल तर अत्यंत पारदर्शी व्यवस्था निर्माण करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचे सांगितले. लोकप्रियतेचा हव्यास टाळून कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. नागरिकांमध्ये अर्थविषयक साक्षरतेचीही नितांत गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सतीश घाटगे यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय मोहन घाटगे यांनी करून दिला. सुलभा दाते यांनी प्रास्ताविक केले. या वेळी वसंतराव घाटगे यांच्यासोबत राहिलेल्या विशेष व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. भानू काळे निर्मित घाटगे यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली. मीना काळे यांनी सूत्रसंचालन केले.

वसंतराव घाटगे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी. सोबत व्यासपीठावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, मोहन घाटगे, सतीश घाटगे. (छाया – राज मकानदार )

Story img Loader