नव्या संवत्सरातील भांडवली बाजारातील निराशादायक वाटचाल सलग दुसऱ्या सत्रातही कायम राहिली आहे. जागतिक नकारात्मक घडामोडींच्या परिणामी माहिती तंत्रज्ञान, पोलाद क्षेत्रातील समभागांच्या विक्रीमुळे ‘सेन्सेक्स’ गुरुवारी १४७.५० अंशांनी खाली येत १८,४७१.३७ पर्यंत घसरला. ‘निफ्टी’तही ३५.९५ अंश घसरण होऊन निर्देशांक ५,६३१ वर बंद झाला. मुहूर्ताच्या सौद्यांमधून नव्या २०६९ संवत्सराची सुरुवात करताना झालेल्या ७५ मिनिटांच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजार अर्धशतकी घसरणीने बंद झाला. भांडवली बाजाराने ऐन नववर्षांच्या स्वागताला नोंदविलेली गेल्या दशकातील तिसरी नकारात्मकता होती.
बाजारातील व्यवहारांवर आजही जागतिक शेअर बाजारांतील नरमाईचा प्रभाव होता. यामुळे पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची सपाटून विक्री झाली. आजच्या ०.७९ टक्के घसरणीमुळे ‘सेन्सेक्स’ पंधरा दिवसांपूर्वीच्या नीचांकावर आला आहे. इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, टाटा स्टील, हिंदाल्को, जिंदाल स्टील, आयटीसी, टाटा मोटर्स, रिलायन्स, स्टेट बँक, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज् लेबोरटरी या आघाडीच्या समभागांचे भाव आज गडगडले. बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी नकारात्मक नोंदली गेली.
दरम्यान, दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी आज चांगला भाव कमावला. या क्षेत्रातील भारती एअरटेलचा समभाग तीन टक्क्यांनी वधारला. गेल्या चार दिवसातील ‘सेन्सेक्स’मधील एकूण घसरण २८४ अंशांची झाली आहे.
रुपया वधारला
गेल्या तीन सत्रातील घसरणीतून डोके वर काढत डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी ५५ च्या गर्तेतून वर आला. यापूर्वी सोमवारी डॉलर-रुपया दर ५५ च्यानजीक ५४.८८ पर्यंत गेला होता. दोन दिवस विदेशी चलन व्यवहार बंद होते. रुपयाचा गुरुवारचा प्रवासही ५४.९८ या तळापासून सुरू झाला. दिवसभरात ५५.०८ पर्यंत नीचांकही त्याने गाठला. मात्र दिवसअखेर रुपया १८ पैशांनी सावरत ५४.७० वर स्थिरावला.