जागतिक अर्थकारण, व्यापार आणि वित्तीय ओघाची नाडी ही देशोदेशीच्या गुंतागुंतीच्या नियमांच्या अधीन सुरू असते. वेगवेगळे करारमदार, मानंदड, करप्रणाली, नियंत्रण-नियमन आणि प्रशासकीय चौकटींना अशा समयी महत्त्वाचे स्थान असते. हिशेब व लेखा परीक्षण यांचेदेखील या अंगाने महत्त्वाचे स्थान आहे. हीच भूमिका ओळखून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)’ची विशेष लेखा परिषदेचे येत्या बुधवारपासून मुंबईत आयोजन केले आहे.
लेखा सेवेतील व्यावसायिकांची ही परिषद एनसीपीए, नरिमन पॉइंट येथे २३ जानेवारी ते २५ जानेवारी असे अडीच दिवस आयोजिण्यात आली असून, ‘लेखा व्यावसायिकांची आर्थिक वृद्धीला मदतकारक भूमिका’ असाच या परिषदेचा चर्चेचा मुख्य आशय आहे. ‘आयसीएआय’चे सह-सचिव कोशी जॉन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २०२० साली भारतातील लेखा सेवांची मागणी आणि आकांक्षापूर्ती असे परिषदेत एक महत्त्वाचे सत्र असेल. ‘आयसीएआय’ भारतात ‘अकाऊंट्न्सी’चे व्यावसायिक व कालसुसंगत दर्जेदार शिक्षण-प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्याबरोबरच, आपल्या सदस्यांना नव्या घडामोडी व फेरबदलांशी अवगत करण्यास हातभार लावत आली आहे.