‘आयपीएल’च्या माध्यमातून झडणाऱ्या यंदाच्या क्रीडा हंगामाला श्रवणीय संगीतासह वैविध्यपूर्ण खानपानाची जोड उपनगरातील पहिल्या ‘स्पोर्ट्स बार’ला मिळाली आहे. ‘फ्यूचर ग्रुप’च्या समूहातील भांडुप (पश्चिम) येथील ३,५०० चौरस फूटवरील हे दालन शुक्रवारपासून खुले होत आहे.
समूहाच्या ‘गॅलेक्सी एन्टरटेन्मेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या अंतर्गत खानपान, संगीत तसेच प्रत्यक्ष क्रीडा माध्यम उपलब्ध कंरून देणारे हे व्यासपीठ ‘स्पोर्ट्स बार’ या नावाने ओळखले जाते. कंपनीची देशभरात अशी सध्या चार दालने असून आणखी काही अल्पावधीत साकारण्याच्या तयारीत आहेत.
भांडुप येथील एलबीएस मार्गावरील नेपच्युन मॅन्गेन मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील ‘स्पोर्ट्स बार’ येत्या शुक्रवारपासून सुरू होत असून येथे प्रत्यक्ष निवडक खेळासह विविध सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याचीही सुविधा आहे. जोडीला संगीत आणि भिन्न खाद्यपदार्थाची चवही चाखण्याची संधी आहे.
आगामी आयपीएलसह टी-२०, फिफा वर्ल्डकप आदी येथील ८ स्क्रीनच्या माध्यमातून पाहण्याची सुविधा असून खेळाडूंच्या नावाने येथे विविध खाद्य तसेच पेय प्रकारही उपलब्ध आहेत. बॅण्ड्स, डीजे तसेच कराओके नाइट्स ही संगीत जोडही उपस्थितांसाठी असेल. उपनगरातील पहिल्या ‘स्पोर्ट्स बार’च्या उद्घाटनप्रसंगी ‘गॅलेक्सी एन्टरटेन्मेंट’चे संचालक सुनील बियाणी यांनी सांगितले की, कंपनी शहरात अशी आणखी दोन दालने सुरू करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, सोलापूर येथेही अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने खिलाडूवृत्ती जोपासण्याचा प्रयत्न
क्रिकेटपासून, फुटबॉल, बिलियर्डसारखे विविध मैदानी खेळ मोबाइलच्या संकुचित पडद्यावर अवतरल्याने खऱ्या क्रीडारसिकांचा प्रत्यक्ष खेळाचा आनंद हिरावला गेला आहे. अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने बॉलला थेट किक लगावण्याचा तसेच टेनिसची रॅकेट जोरदार फिरविण्याचा खेळाडूपणा ‘गॅलेक्सी’च्या ‘स्पोर्ट्स बार’द्वारे जोपासण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी कंपनीने मूळच्या ब्रिटनमधील कंपनीबरोबर तांत्रिक सहकार्य केले असून असे खेळ आपल्या विविध दालनांमध्ये अवतरण्यासाठी प्रयत्न केले आहेत. क्रीडासह खानपान, संगीत आदींची जोड असणाऱ्या या पर्यायाला सध्या ‘कॉर्पोरेट विश्वा’कडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला गेला आहे. भारतातील ‘स्पोर्ट्स बार’ उद्योग हा १,२०० कोटी रुपयांचा असून त्याची वार्षिक व्यवसाय वाढ २० टक्के आहे.

Story img Loader