२०१२ अखेर ८ लाख कोटी रुपयांचा पल्ला पुन्हा गाठताना देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक गंगाजळी जमविली आहे. भारतातील प्रमुख ४४ म्युच्युअल फंड कंपन्यांकडून डिसेंबर २०१२ तिमाहीअखेर ७,८६,५४३ लाख कोटी रुपयांचा निधी व्यवस्थापनासाठी गोळा केला आहे.
२०११ मध्ये अवघ्या एक टक्क्याने वधारलेली फंड कंपन्यांची गंगाजळी गेल्या संपूर्ण वर्षांत १५ टक्क्यांनी वधारली आहे. ४४ पैकी ३३ कंपन्यांनी मालमत्तेतील वाढ नोंदविली आहे. तर डिसेंबर २०१२ अखेरच्या तिमाहीत एचडीएफसीची आघाडी कायम राहिली आहे. तर एल अॅण्ड टी म्युच्युअल फंडाची वाढ सर्वाधिक नोंदली गेली आहे.
डिसेंबर २०११ अखेर फंडांची मालमत्ता ७,४७,३३३ कोटी रुपये होती. यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नोंदली गेलेली मालमत्ता ही सप्टेंबर २०१० नंतरची सर्वाधिक मालमत्ता ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी ८ लाख कोटी रुपयांच्या घरातील सर्वाधिक मालमत्ता फंड कंपन्यांनी नोंदविली आहे. गेल्या वर्षभरात भांडवली बाजाराचा प्रवास दोलायमान, १९,५०० च्या खालीच राहिल्याने फंडांनी पुन्हा ८ लाख कोटी रुपयांपर्यंतची मजल मारलीच नव्हती.
म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ने जारी केलेल्या माहितीनुसार, गेल्या तिमाहीतील फंड मालमत्ता वाढ ही सलग तिसऱ्या तिमाहीत चढती राहिली आहे. या कालावधीत ३९,२०० कोटी रुपयांनी मालमत्ता वधारली आहे. भारतातील स्थानिक कंपन्यांच्या मालमत्तेचा वाटा ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ या कालावधीत ७०,६३८ कोटी रुपये राहिला आहे. आधीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ७०,७८३ कोटी रुपयांवरून यंदा घसरला आहे.
४४ फंड कंपन्यांमध्ये एचडीएफसीची मालमत्ता संचयनात आघाडी कामय राहिली आहे. तर पाठोपाठ रिलायन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलचा क्रम राहिला आहे. तुलनेत बीएनपी पारिबाज, एडेलविस, गोल्डमॅन सॅच, प्रेमेरिका या कंपन्यांच्या मालमत्तेत या तिमाहीत घट नोंदली गेली आहे. ४४ पैकी ३३ कंपन्यांची मालमत्ता वधारली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा