भागधारक वित्तसंस्थांच्या ‘इप्सिता’ला सामान्य गुंतवणूकदारांनी फशी पडावे काय?

पतमापन सेवा देणारी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ‘केअर’ने शुक्रवारी आपल्या प्रथामिक खुल्या विक्रीला प्रारंभ केला. भारतीय औद्योगिक विकास (आयडीबीआय) बँकेने प्रवíतत केलेल्या ‘केअर’ या कंपनीत सध्या एकूण ३० भारतीय अर्थसंस्था भागधारक असून, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, भारतीय स्टेट बँक  व आयएल अ‍ॅण्ड एफएस हे प्रमुख भागधारक आहेत. प्रस्तावित भागविक्रीचे उद्दिष्ट हे या वर उल्लेख आलेल्या प्रमुख चार भागधारकांकडे असलेल्या एकूण ६७.२% भागभांडवलापैकी २५.२ टक्के हिश्शाची विक्री हेच आहे. भागविक्रीपश्चात या चार प्रमुख भागधारकांचा कंपनीतील हिस्सा ४५% वर येणार आहे. म्हणजे भागविक्रीतून उभा राहणारा सर्व निधी आगामी विकास-विस्तारासाठी कंपनीकडे येणार नाही तर या चार भागधारकांना मिळणार आहे.
१९ वर्षांपूर्वी या अर्थसंस्थानी दर्शनी मूल्यास म्हणजे दहा रुपयास हे समभाग घेतले होते. १२ मार्च २०१० रोजी १०० समभागास १८ समभाग तर २० सप्टेंबर २०११ रोजी दोन समभागास एक समभाग बक्षीस स्वरूपात त्यांना मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येकी १० रुपये गुंतवणुकीचे मूल्य आज तीन रुपयांपेक्षा कमी झाले असून, या अर्थसंस्था आता खुल्या भागविक्रीत तो तीन रुपयांचा समभाग प्रत्येकी ७०० ते ७५० दरम्यान विक्री करून रग्गड लाभ मिळविणार आहेत. दरम्यान ‘केअर’कडून मिळालेल्या लाभांशापोटी हे तीन रुपये सुद्धा त्यांनी कधीच वसूल झाले असून प्रत्यक्षात या गुंतवणुकीचे मूल्य शून्य झाले आहे.  
कंपनीने सेबीकडे भागविक्रीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावपत्रात (आरएचपी) ही माहिती दिली असून, ते सेबीच्या संकेतस्थळावही उपलब्ध आहे. भागविक्रीपश्चात आयडीबीआय हा ‘केअर’चा सर्वात मोठा भागधारक राहणार असून भागभांडवलातील वाटा १७.१९% राहणार  असून त्या खालोखाल कॅनरा बँकेचा वाटा १५.२१% तर ६.४१ टक्के हिश्शासह तिसऱ्या क्रमांकावर भारतीय स्टेट बँक राहणार आहे.     

किरकोळ गुंतवणूकदार उदासीनच!
प्राथमिक भांडवली बाजाराला खूप मोठय़ा खंडानंतर पुन्हा उत्साही वळण देऊ शकेल अशी प्रारंभिक भागविक्री म्हणून चर्चेत असलेल्या ‘केअर’च्या विक्रीबाबत पहिल्या दिवशी मात्र किरकोळ गुंतवणूकदारांची उदासीनताच दिसून आली. अर्थात अपेक्षेप्रमाणे संस्थात्मक गुंतवणूकदारांचा या भागविक्रीला भरघोस प्रतिसाद दिसून आला.  रु. ७०० ते रु. ७५० या किंमतपट्ट्यात रु. १० दर्शनी मूल्य असणाऱ्या ७१,९९,७०० समभागांची विक्री करून कंपनी ५०० ते ५४० कोटी रुपये उभारणार असून, एकूण भाग भांडवलाच्या २५.२०% हिश्शाची याद्वारे विक्री होणार आहे. यापकी २५,१९,८९५ समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहेत. आजच्या पहिल्या दिवशी संस्थात्मक गुंतवणूकदरांनी या विक्रीस भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी त्यांच्या वाट्याच्या हिश्शापेक्षा १.८ पट मागणी नोंदविली गेली. त्या उलट किरकोळ गुंतवणूकदरांनी अल्प प्रतिसाद देत त्यांच्या वाटयापकी फक्त २५% (पाव पट) मागणी नोंदविली.अर्ज करून सुद्धा प्रत्यक्ष समभाग मिळत नसल्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता खुल्या भागविक्रीकडे पाठ फिरविण्याची झाली आहे. तसेच ‘केअर’पाठोपाठ  भारती इन्फ्राटेलची (१० डिसेंबरपासून) खुली भागविक्री होत असल्याचा हा विपरीत परिणाम दिसत असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले.