कंपनी आपल्या शेअर्सची नोंदणी ( listing) कोणत्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये करायचे ते ठरवते. मग गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी विक्री सुरू करतात. मात्र अलॉटमेंट होऊन शेअर्स पात्र डिमॅट खातेदारांच्या खात्यात जमा झाल्यानंतर लिस्टिंग होईपर्यंत दोन्ही डिपॉझिटरींमध्ये (सीडीएसएल आणि एनएसडीएल) ते शेअर्स गोठवलेले असतात. याचा अर्थ ज्यांना शेअर्स मिळाले आहेत ते गुंतवणूकदार आपल्या डिमॅट खात्यातील शेअर्स कुणालाही देऊ शकत नाहीत. ज्या दिवशी शेअर्सचे लिस्टिंग होते त्या दिवशी सकाळी ते शेअर्स दोन्ही डिपॉझिटरीत मुक्त (active)  केले जातात. यालाच ‘आयझिन अॅक्टिव्ह’ झाली असे म्हणतात. पण ‘आयझिन’ म्हणजे तरी काय ?
व्यवहारात आपण म्हणतो की माझ्याकडे कोलगेट, टाटा केमिकल, इन्फोसिसचे शेअर्स आहेत. पण डिमॅट परिभाषेत प्रत्येक कंपनीच्या शेअर्सना, डिबेंचरना, बाँडसना एक १२ आकडी क्रमांक दिलेला असतो त्याला आयझिन कोड (ISIN Code) असे नाव आहे. ISIN  हे संक्षिप्त रूप आहे त्याचा अर्थInternational Securities Identification Number.  हा नंबर सेबी देते. कारण सेबी ही भांडवली बाजाराची नियंत्रक संस्था आहे. आपल्या देशात सुमारे ६,००० कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स, बाँड्स वैगरे मिळून सुमारे ३०,००० आयझिन म्हणजेच सिक्युरिटीज आहेत. कंपन्या आणि आयझिन यांचे प्रमाण व्यस्त असण्याचे कारण एक कंपनी अनेक प्रकारच्या सिक्युरिटीज वितरीत करते. उदाहरणच द्यायचे तर आयसीआयसीआय बँक लिमिटेड ही एक कंपनी पण तिने शेअर्स, डिबेंचर्स, अनेक प्रकारचे बाँड्स अशा शेकडो सिक्युरिटीज वितरीत केल्या आहेत. त्यामुळे तितक्या संख्येने आयझिन कोड्स आहेत.  
एखाद्या कंपनीचा आयझिन कोड आपल्याला कळणार कसा? सोपे आहे.  आपल्याला डिमॅट खात्याचे स्टेटमेंट मिळते त्यात हा कोड लिहिलेला असतो. पण जे शेअर्स माझ्या डिमॅट खात्यात नाहीत त्याचा आयझिन कोड समजण्यासाठी काही वेबसाइट्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ  http://www.cdslindia.com  एखाद्या कंपनीच्या शेअरचा आयझिन कोड हा जगात सर्वत्र सारखाच असेल. म्हणजे असे की कोलगेट कंपनीचे शेअर्स सर्व स्टॉक एक्सचेंज, सर्व ब्रोकर्स, दोन्ही डिपॉझिटरीज, सर्व डीपी INE259A01022  या नंबरानेच ओळखणार. इतकेच नव्हे उद्या कोलगेटचे शेअर्स लंडन शेअर बाजारात लिस्ट झाले तरी ते तिथेही याच नंबराने ओळखले जाणार. आपल्या देशातील सर्व कंपन्यांच्या शेअर्सचे आयझिन कोड IN या अक्षरांनी सुरू होतात. कारण सर्व कंपन्या भारतात स्थापन झालेल्या आहेत. जेव्हा एखाद्या नवीन सिक्युरिटीजला आयझिन कोड दिला जातो त्याच वेळी त्या कंपनीच्या नावाने एक ‘तात्पुरता’ असा आणखी एक आयझिन कोड निर्माण केला जातो जो दोन्ही डिपॉझिटरीत दाखल असतो. हा आयझिन कोड नेहमी गोठवलेल्या स्थितीतच असतो. याचे कारण असे की, उदाहरणार्थ अबक लिमिटेड कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स जाहीर केले की त्याचे वितरण म्हणजेच प्रचलित  भागधारकाच्या डिमॅट खात्यात ते शेअर्स जमा होतील, पण उपरोक्त आयझिन गोठवलेल्या  स्थितीत असल्याने भागधारक ते शेअर्स विकू शकणार नाहीत. कारण बोनस शेअर्स जरी वितरीत झाले असले तरी त्याचे खरेदी व विक्री व्यवहार होण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजची परवानगीही लागते त्यालाच लििस्टग झाले असे म्हणतात. म्हणजे एखाद्या प्रसंगी लििस्टग तीन दिवसानंतर झाले असेल तर तितके दिवस भागधारक ते शेअर्स विकू शकत नाही. लििस्टगद्वारा परवानगी मिळाली की तसे डिपॉझिटरीला स्टॉक एक्स्चेंज कळवते म्हणजे मग ‘आरटीए’द्वारा सदर तात्पुरत्या आयझिन कोडखाली डिमॅट खात्यात असलेले शेअर्स मूळ आयझिनच्या अंतर्गत जमा केले जातात. ‘तात्पुरता’  कोडखाली दिसत असलेले शेअर्स यापुढे डिमॅट खात्यात दिसणार नाहीत.
संगमनेरहून अतुल कोतकर विचारतात की ऑक्शन म्हणजे काय? काही कारणामुळे शेअर्स विकणाऱ्या गुंतवणूकदाराने आपल्या ब्रोकरला शेअर्स दिलेच नाहीत तर अर्थातच ब्रोकर स्टॉक एक्सचेंजला शेअर्स देऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत स्टॉक एक्सचेंज बाजारातून शेअर्स खरेदी करून ते खरेदीदार ब्रोकरला देते. अर्थात जास्त भावाने खरेदी करावे लागल्यास फरकाची रक्कम मूळ शेअर्स विकणाऱ्या ब्रोकरकडून स्टॉक एक्सचेंज वसूल  करते जो ते पसे आपल्या ग्राहकाकडून वसूल करतो. काही वेळा उपरोक्त शेअर्स स्टॉक एक्स्चेंजला कमी भावानेही मिळू शकतात. अशा वेळी शिल्लक राहिलेले पसे स्टॉक एक्सचेंज आपल्या Investors Protection Fund मध्ये जमा करून घेते. कोतकर यांचा दुसरा प्रश्न असा की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांचे एक डिमॅट खाते आहे त्या ऐवजी त्यांना दुसरे खाते दुसऱ्या डीपीकडे उघडायचे आहे तर नवीन केवायसी कागदपत्रे द्यावी लागतील का? तुमचा केवायसी सीडीएसएल व्हेंचर किंवा अन्य कुणा ‘केआरए’कडे नोंदणी झालेला असेल तर परत नव्याने कागदपत्रे देण्याची गरज नाही. अर्थात हे फक्त ट्रेडिंग किंवा डिमॅट खाते उघडताना. बँकेत बचत खाते उघडायचे असेल तर मात्र केवायसी करावी लागेल. मात्र उपरोक्त केवायसी बँकेतील बचत खात्यासाठी देखील चालावी असे प्रयत्न सुरू आहेत.
लातूर येथील भगवान फड यांच्याकडे अॅक्वा लॉजिस्टिक्स या कंपनीचे २,५०० शेअर्स आहेत ते त्यांना विकता येत नाहीत अशी तक्रार आहे. याबाबत असे सांगतो की तुमचा ब्रोकर म्हणतो ते सत्य आहे कारण सदर कंपनी दोन्ही स्टॉक एक्स्चेंजमध्ये सांप्रत  नोंदणीकृत नाही. म्हणजे पूर्वी होती पण आता नाही. कारणे काही असतील ती स्टॉक एक्स्चेंजला माहीत असतात.