आगामी २०१३ नववर्षांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या ख्रिसमसपासून नववर्षांची पहाट उगवेपर्यंत साजरी केली जाणारी सुट्टीच यंदा लिंक्डइन, याहूसह अनेक आघाडीच्या कंपन्यांनी रद्द केली आहे. गुगलसारख्या स्पर्धक कंपनीचा सामना करणाऱ्या याहूने तर नव्या २०१३ वर्षांत २० टक्के कर्मचारी कपातीच्या संकटाचेही संकेत दिले आहेत.
गुगलच्या सेवेत यापूर्वी असणाऱ्या याहूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरिसा मेयर यांनी सूत्रे हातात घेताच कंपनीला वित्तीय संकटातून सावरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कंपनी मोबाईल निर्मितीतही उतरत असतानाच मनुष्यबळावर अधिक लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होणारी आठवडय़ाची नववर्षांची सुट्टी रद्द करण्यात आल्याचे फर्मान बजाविण्यात आले आहेत.
अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात माहिती तंत्रज्ञान व्यवसाय आहे. मुळच्या अमेरिकेतील कंपन्यांसह अनेक भारतीय कंपन्याही येथे आहेत. महसुलाचा मोठा हिस्सा या कंपन्यांना या भागातून मिळतो. येथील भारतीय कंपन्यांनी त्यांचे आगामी भविष्याचे अंदाज घटविले असतानाच आता विदेशी आयटी कंपन्यांनीही हात आखडता  घेतला आहे.
याहूने काही दिवसांपूर्वीच काही प्रमाणात कर्मचारी कपातही केली होती. आताही आवश्यक कर्मचारी ठेवण्याचा इरादा जाहीर करण्यात आला आहे. यानुसार २० टक्के कर्मचारी कपात नव्या वर्षांत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कंपनीत सध्या १२ हजार कर्मचारी आहेत. ‘सध्या करायला खूप काम आहे; तेव्हा आरामासाठी अजिबात वेळ नाही’ असे फर्मानच याहूच्या मेयर यांनी जाहीर केले आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन मनुष्यबळ विकासाबाबत आगामी निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत कंपनीने गेल्या सप्टेंबरमध्ये आढावा घेतला होता. कंपनीने निश्चित केलेली वार्षिक तसेच तिमाही उद्दिष्ट साकार करण्याच्या मार्गावर सध्या मार्गक्रमण सुरू असल्याचेही कंपनीने म्हटले होते. मेयर बाईंचे हे धोरण गुगलमध्येही अनुसरले गेले होते.    

कंपनीने निश्चित केलेली वार्षिक तसेच तिमाही उद्दिष्ट साकार करण्याच्या मार्गावर सध्या मार्गक्रमण सुरू आहे. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन मनुष्यबळ विकासाबाबत आगामी निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सध्या करायला खूप काम आहे; तेव्हा (सुट्टी) आरामासाठी अजिबात वेळ नाही.
-मेरिसा मेयर
‘याहू’च्या मुख्याधिकारी

Story img Loader