रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांची भीती
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेली जन धन बँक खाती मोहीम ही पैशाच्या दुरुपयोगाचे एक माध्यम होण्याबाबत शंका उपस्थित करतानाच बँक क्षेत्रातील एखादा घोटाळाही यामार्फत होऊ शकतो, असे नमूद करत बँकांना सावधगिरीचा इशारा खुद्द रिझव्र्ह बँकेने दिला आहे.
‘भारतीय बँकिंग संहिता आणि मानक मंडळा’च्या (बीसीएसबीआय) मुंबईतील परिषदेत रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा हे मुख्य पाहुणे या नात्याने बोलत होते. संहिता पालन अधिकाऱ्यांच्या या परिषदेला विविध ११० बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बँकांमधून सुरू करण्यात आलेल्या जन धन योजनेंतर्गतच्या बँक खात्यांद्वारे पैशाचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याचे मुंद्रा यांनी यावेळी सांगितले. याबाबत बँकांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे नमूद करत मुंद्रा यांनी त्यासाठी आवश्यक अशी देखरेख यंत्रणा बँकांनी विकसित करावी, असेही सुचविले.
बँकांमध्ये ही योजना राबविली जात असली तरी अशी बँक खाती त्रयस्थ व्यक्तीकडून हेरले जाण्याची शक्यता असून त्यात पैशाचा गैरव्यवहार होऊ शकतो, असे मुंद्रा यावेळी म्हणाले. संबंधित खातेदाराला माहिती नसतानाही त्याद्वारे मोठय़ा रकमेचे व्यवहार झाल्याचे मुंद्रा यांनी यावेळी नुकत्याच झालेल्या एका प्रकाराद्वारे लक्ष वेधले. पंजाबमधील या खात्याद्वारे एक कोटी रुपयांच्या रकमेचे व्यवहार झाल्याचे ते म्हणाले. ही बाब प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित खातेदाराच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लक्षात आल्याचेही ते म्हणाले.
जन धन योजनेंतर्गत नव्याने खाते सुरू झाल्यानंतर त्यांची देखभाल, चाचपणी याकडे बँकांना अतिरिक्त ताणामुळे पुरेसा लक्ष देण्यात कुचराई होऊ शकते, असे नमूद करत डेप्युटी गव्हर्नरांनी अशी खाती सुरू करण्यासाठी ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ ही निर्धोक पद्धतीही लागू केली जात नाही, असे नमूद केले. ग्राहकांच्या हिताकरिता अशा संरक्षणात्मक तरतुदींची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले. अशाप्रकरणात अपयशी ठरणाऱ्या बँकांविरुद्ध कारवाई करण्यात रिझव्र्ह बँक मागे – पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी सूचित केले. निधीचा गैरवापर अथवा काळा पैसा या अंतर्गत संबंधित तपास यंत्रणाही त्यावर कारवाई करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
बँकांमधील गैरप्रकाराकरिता संबंधित ग्राहकाच्या दायित्वाचीही चाचपणी केली जाईल, असे मुंद्रा यांनी यावेळी सांगितले. याबाबत रिझव्र्ह बँक लवकरच तिचा एक आराखडा सादर करेल, असे ते म्हणाले.
बँकांमार्फत विकले जाणाऱ्या विविध उत्पादनांच्या गैर व्यवहारावरही बोट ठेवताना मुंद्रा यांनी बँकांमार्फत तिसऱ्या माध्यमातून ग्राहकांना विमा योजना, कर्ज आदी उत्पादने विकताना आढळत असलेल्या गैर प्रकारांचे प्रमाण हल्ली वाढत असल्याकडेही मुंद्रा यांनी यावेळी लक्ष वेधले.
ऑनलाईनच्या माध्यमातून वाढणाऱ्या बँक व्यवहारांमुळे बनावट एटीएम कार्डद्वारे रक्कम काढून घेणे, गैररित्या निधीचे हस्तांतरण अशा तक्रारी वाढत असल्याचेही मुंद्रा म्हणाले.
बँकांमधील गैरप्रकाराकरिता संबंधित ग्राहकाच्या दायित्वाचीही चाचपणी केली जाईल. बँकांममधील निधी ्रगैरव्यवहारामुळे रिझव्र्ह बँक अन्य बँकांवर कारवाईही करू शकते. याबाबत रिझव्र्ह बँक लवकरच तिचा एक आराखडा सादर करेल.
– एस. एस. मुंद्रा, डेप्युटी गव्हर्नर, रिझव्र्ह बँक.
बँक घोटाळ्यांना ‘जन धन’मध्ये वाव!
रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांची भीती
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:
First published on: 24-05-2016 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jan dhan accounts more vulnerable to frauds says rbi