आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सितारामण सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्माला यांचा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. हा अर्थसंकल्प सादर करण्याआधीच केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला सुखद धक्का देणारी एक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी महिन्यामध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन १.२० लाख कोटींवर पोहचलं आहे. विशेष म्हणजे जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतरचे हे एका महिन्यातील सर्वाधिक कर संकलन आहे.

अर्थ मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार मागील पाच महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने जीएसटी संकलनाचा आकडा वाढत होता तोच ट्रेण्ड या महिन्यात दिसून आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलन हे आठ टक्क्यांनी वाढले आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक लाख १९ हजार ८४७ कोटी रुपये जीएसटी संकलन झालं. यापैकी २१ हजार ९२३ कोटी सीजीएसटी म्हणजेच केंद्राला दिला जाणारा कर तर २९ हजार १४ कोटी एसजीएसटी म्हणजेच राज्य सरकारचा जीएसटी वाटा आहे. त्याप्रमाणे ६० हजार २८८ कोटींचा आयजीएसटीचा (इंटीग्रेेटेड जीएसटी) यामध्ये समावेश आहे. डिसेंबर ते २१ जानेवारी दरम्यान ९० लाख जीएसटीआर- थ्री बी रिटर्न दाखल झाले आहेत. जीएसटी विक्रीवर मोठ्याप्रमाणात रिटर्न दाखल करण्यात आल्याने कर संकलनाचा हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यापासून जीएसटीचे संकलन वेगाने वाढत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. डिसेंबरमध्ये जीएसटीचे संकलन एक लाख १५ हजार १७४ कोटी रुपये इतके होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या तुलनेत हा आकडा १२ टक्क्यांनी अधिक होता. मागील वर्षी म्हणजेच २०२० रोजी जीएसटीचे एकूण संकलन हे एक लाख चार हजार ९६३ कोटी रुपये इतके होते. अर्थसंकल्पाच्या आधीच ही आकडेवारी समोर आल्याने देशातील कर संकलनाची परिस्थिती करोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानानंतर पुन्हा सामान्य होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे याचा आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.