चेन्नईऐवजी श्रीसिटीतून वाहन निर्मितीचा निर्णय
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला प्रतिसाद ठरणाऱ्या जपानी वाहन उत्पादक इसुझु मोटर्स इंडियाच्या आंध्र प्रदेश येथील नव्या प्रकल्पाचा शुभारंभ बुधवारी श्रीसिटी येथून झाला. राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते कंपनीच्या पहिल्या डी-मॅक्स व्ही-क्रॉस या पिक अप वाहनाचे सादरीकरणही या वेळी झाले.
इसुझु मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक नाओहिरो यामागुची यांनी या वेळी सांगितले की, कंपनीने येत्या तीन वर्षांसाठी या प्रकल्पातून वार्षिक ५०,००० वाहन निर्मितीचे ध्येय राखले आहे. टप्प्याटप्प्याने ही क्षमता १.२० लाखपर्यंत नेली जाईल. जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सू हेही या वेळी उपस्थित होते. कंपनीने गेल्या दोन वर्षांत एकूण ३,००० वाहनांची विक्री भारतात केली आहे. कंपनीचे एमयू ७ हे स्पोर्ट युटिलिटी गटातील वाहन सध्या हिंदुस्थान मोटर्सच्या चेन्नई येथील प्रकल्पात तयार होते. ते तूर्त येथे हलविण्यात येणार नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र तेथे तयार करण्यात येणारे डी-मॅक्स हे वाहन आता चेन्नईऐवजी श्रीसिटीत तयार होईल, असेही सांगण्यात आले.
इसुझुचा जपान व्यतिरिक्त भारतातील हा तिसरा प्रकल्प आहे.

Story img Loader