स्वैपाकघरासाठी उपयुक्त उपकरणांच्या निर्मितीतील जागतिक अग्रेसर अमेरिकी कंपनी जार्डन कॉर्पोरेशनची भारतातील १०० टक्के अंगिकृत कंपनी जार्डन कन्झ्युमर सोल्युशन्स ऑफ इंडिया प्रा. लि.ने देशांतर्गत बाजारपेठेत वाढीचे विविध मार्ग तपासत असून, त्यात या क्षेत्रातील प्रस्थापित कंपनीवर ताबा मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतासारख्या होम आणि किचन अप्लायन्सेसच्या अत्यंत विखुरलेल्या बाजारपेठेत, राष्ट्रीय स्तरावर चिरपरिचित व अस्तित्त्व असलेला ब्रॅण्ड, प्रामुख्याने उत्तर व दक्षिण भारतात मजबूत पाया असलेल्या आणि स्वत:ची उत्पादन सुविधा असलेल्या पिढी दर पिढी चालविल्या जात असलेल्या कंपनीचा अधिग्रहणासाठी शोध सुरू असल्याचे, जार्डन कन्झ्युमर सोल्यूशन्सच्या भारतातील प्रभारी व महाव्यवस्थापिका प्रग्या कालिया यांनी सांगितले. या ताबा व्यवहारासाठी साधारण १५० ते २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘ऑस्टर’ या नाममुद्रेखालील उत्पादनांनी अमेरिका-युरोपात विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या या ८६ वर्षे जुन्या जार्डनने आजवर अशा अनैसर्गिक धाटणीनेच व्यवसाय विस्तार साधला आहे. अलिकडेच जार्डनने ब्रिटनमध्ये ‘ब्रेव्हिल’ केटल्स आणि इस्त्रीच्या ब्रॅण्डवर ताबा मिळविला. तर गेल्या जागतिक आर्थिक अरिष्टाच्या पाश्र्वभूमीवर व्यापारजगतासाठी खडतर राहिलेल्या चार वर्षांत तिने तीन कंपन्यांवर युरोपात ताबा मिळविला असल्यानेच, कंपनीची एकूण आर्थिक कामगिरी तुलनेने खूपच चांगली राहिली आहे. २००९ साली ४.८ अब्ज डॉलरची कंपनीची जागतिक उलाढाल म्हणून डिसेंबर २०११ अखेर ६.६ अब्ज डॉलरवर पोहोचू शकली आहे, असे कालिया यांनी सांगितले.
जार्डन कन्झ्युमर सोल्यूशन्सचे भारतात ऑस्टर या ब्रॅण्ड अंतर्गत, चाय व ड्रिंक मेकर, मिक्सर ग्रांइडर, राइस कूकर, सँडविच मेकर, टोस्टर, इलेक्ट्रिक केटल, स्टीम आयर्न आणि ड्राय आयर्न अशी उत्पादने तर ‘बायोनेअर’ या ब्रॅण्ड अंतर्गत एअर प्युरिफायर आणि टॉवर फॅन अशी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षांत कंपनी १००- १२० टक्के दराने विक्रीमध्ये प्रगती साधली आहे. देशातील होम-अप्लायन्सेस विक्रेत्या शृखंलाद्वारे कंपनीची उत्पादने देशातील १९ प्रमुख महानगरे व शहरांमधून उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, ठाण्याव्यतिरिक्त, अलीकडे नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर-सांगली या शहरांमध्ये ऑस्टर ब्रॅण्ड पोहचले आहे. आगामी काळात कंपनीने स्वत:ची स्टोअर्स थाटण्याचे लक्ष्य निश्चित केले नसले तरी ग्राहकांना उत्पादनांच्या वापराची अनुभूती देणारी १०-१२ एक्स्पीरियन्स सेंटर्स सुरू करण्याचा मानस असल्याचे कालिया यांनी सांगितले.     

Story img Loader