‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’अंतर्गत आज सामंजस्य करार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब राज्यातील ३० हजार तरुणांना ‘हेअर स्टाईल’ चे प्रशिक्षण देऊन रोजगारही देणार आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांना एका मोठय़ा हेअरस्टाईल बँड्रमध्ये संधी मिळणार आहे. ‘प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान’ अंतर्गत राज्य सरकार अनुदान देणार असून त्याबाबत कौशल्य विकास मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील आणि हबीब यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार केला जाणार आहे.

जावेद हबीब हे हेअरस्टाईल सलून क्षेत्रातील एक आघाडीचे नाव. देशभरात सुमारे ५५० सलून्स असून आता अमेरिका व अन्य देशांमध्येही त्यांचा विस्तार केला जाणार आहे. त्यांची महाराष्ट्रात १०० हून अधिक ठिकाणी सलून्स आहेत. त्यामध्ये आता राज्यातील १० हजार तरुणांना दरवर्षी प्रशिक्षण व रोजगार दिला जाणार आहे. राज्य सरकार हबीब यांच्याशी तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करणार शुक्रवारी करणार असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.

प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत दोन लाख तरुणांना प्रशिक्षण व रोजगार देण्याची योजना आहे. जावेद हबीब यांच्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर येथील सलूनमध्ये प्रामुख्याने हे प्रशिक्षण दिले जाईल. ते साडेतीन महिन्यांसाठी असेल आणि प्रवेशप्रक्रिया त्यांच्याकडूनच होईल. प्रत्येक तरुणाच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकार प्रतितास ३० रुपये अनुदान जावेद हबीब यांना देईल. तरुणांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्काचा वाटा ४० टक्के राहील आणि प्रशिक्षण शुल्काचा ३० टक्के हिस्सा जावेद हबीब यांच्याकडून सीएसआरच्या माध्यमातून उभारला जाईल, असे कपूर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १५ वर्षे अधिवास असलेल्या तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल. पहिल्या तीन महिन्यांमध्ये दोन हजार तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. दरवर्षी १० हजार तरुणांना प्रशिक्षण व रोजगार देण्याची हमी हबीब यांनी राज्य सरकारला दिली आहे. ज्या तरुणांना स्वतचा व्यवसाय करावयाचा असेल, त्यांना मुद्रा बँकेमार्फत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्यासाठीही राज्य सरकारकडून पावले टाकण्यात येणार आहेत. त्यांना आपल्या व्यवसायासाठी जावेद हबीब यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल व त्याचा वापर ‘बँड्र नेम’ म्हणून करता येईल, असेही कपूर यांनी स्पष्ट केले.