गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या जेटमधील इतिहादच्या हिस्सा खरेदीची प्रक्रिया अखेर वेग पकडू लागली आहे. जेट एअरवेजच्या संचालक मंडळाने अबु धाबीच्या हवाई कंपनीला २४ टक्के हिस्सा विक्रीचा प्रस्ताव बुधवारी मंजूर केला. यानुसार जेटचे २.७२ कोटी समभाग प्रत्येकी रु. ७५४.७३ दराप्रमाणे २,०५७ कोटी रुपयांना इतिहाद एअरवेजला विकण्यात येणार आहेत. जेटने निश्चित केलेले समभाग मूल्य बुधवारी व्यवहार बंद झालेल्या मुंबई शेअर बाजारातील ५७३.८५ रुपयांच्या तुलनेत तब्बल ३१.७ टक्के अधिक आहे.
जेट लवकरच या प्रस्तावाला भागधारकांची मंजुरी मिळविण्यासाठी सभा बोलाविणार आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव नागरी हवाई महासंचालकांकडेही पाठविण्यात येणार आहे. इतिहादच्या ६६ विमानांद्वारे आठवडय़ाला १,३०० उड्डाणे विविध ५५ देशांमधून व ८८ मार्गावर होतात. नव्या भागीदारीमुळे देशातील विविध २३ शहरांमधून १४० आंतरराष्ट्रीय उड्डाणे होण्यास मदत होईल. भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून दुबईसाठी असलेली आसनक्षमता १४,००० असून येत्या तीन वर्षांत ती ४२,००० होईल, असा विश्वास या क्षेत्राला आहे.
केंद्रीय नागरी हवाईमंत्री अजितसिंह यांनी मात्र या व्यवहाराबाबत आपण तसेच नागरी हवाई संचालनालय व प्राधिकरण अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. भारतीय हवाई क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर जेटच्या हिस्सा विक्रीची चर्चा जोरात सुरू होती. दुबईच्या इतिहादने याबाबत जेटकडे विचारणाही केली होती. या दरम्यान, विदेशातील सहकार्य व्यवसायासाठी जेट-इतिहादमध्ये यशस्वी चर्चा झाली होती.
भारतीय हवाई क्षेत्र वाढीव थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुले झाल्यानंतर अर्थात पहिली प्रक्रिया जेट-इतिहादच्या माध्यमातून होणार होती. मात्र उभयतांमधील चर्चा विस्तारत गेल्याने यामध्ये अखेर टाटाने बाजी मारली. टाटा समूहाने मलेशियाच्या एअर एशियाबरोबर भागीदारी करत स्वतंत्र कंपनीही या दरम्यान अस्तित्वात आणली. उभयतांमार्फत कर्मचारी भरती मोहीमही सुरू झाली असून नजीकच्या महिन्यात देशांतर्गत विमान सेवाही सुरू होईल.

Story img Loader