रंगांच्या पुरवठय़ातील अग्रेसर कंपनी कन्साइ नेरॉलॅकला सणासुदीच्या हंगामात कंपनीच्या सजावटीच्या रंग विभागाच्या मागणीत सरासरीपेक्षा दुपटीने वाढ दिसून येत आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये रंगांची मागणीतील वाढ ३० टक्क्यांच्या घरातील असे कंपनीने स्पष्ट केले.
कन्साइ नेरॉलॅक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची रंग कंपनी असून, वाहन उद्योगक्षेत्रात ५७ टक्के बाजारहिस्सा असलेली ती क्रमांक एकची कंपनी आहे. वाहन उद्योगातून मागणी एकूणच घसरलेली विक्री आणि अर्थव्यवस्थेतील मरगळीपायी १२-१५ टक्क्यांच्या दराने वाढते आहे. मात्र यंदा उशिराने आलेली दिवाळी आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात सप्टेंबरपासून दिसून आलेल्या उभारीमुळे सजावटीच्या रंगाला चांगली मागणी मिळविणारे ठरले असल्याचे कन्साइ नेरॉलॅकचे महाव्यवस्थापक (विपणन) राम मेहरोत्रा यांनी सांगितले. कंपनीला मार्च २०१३ अखेर विक्री उलाढालीत एकूण १५ टक्क्यांच्या वाढीसह रु. २६०० कोटींवर जाणे अपेक्षित आहे. दिवाळीपश्चात रंगाची बाजारपेठेला पुन्हा उतरती कळा लागते. परंतु दिवाळीमुळे कंपनीची तिमाही कामगिरी उंचावण्याबरोबरच, दिवाळीनंतर अर्थव्यवस्थेतील सकारात्मकतेबरोबरीनेच वाहन-स्थावर मालमत्ता या अर्थव्यवस्थेतील दोन महत्त्वाच्या घटकांमधील अपेक्षित उभारी पाहता आगामी तिमाहीत विक्री कामगिरी उत्साहवर्धक राहण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. २२ हजार कोटी रुपयांच्या रंग बाजारात नेरॉलॅकचा वाटा १८ टक्के आहे. कंपनीने अलीकडे विपणन व वितरणावर भर देत त्यावर ११० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे मेहरोत्रा यांनी कंपनीच्या लोअर परळमधील मुख्यालयात विकसित करण्यात आलेल्या नव्या ‘अनुभूती केंद्रां’ची संकल्पना समजावून देताना सांगितले. पारंपरिकरीत्या हार्डवेअर स्टोअर्स तसेच कंपनीच्या विशेष दालनांमधून विकल्या जाणाऱ्या रंगात, ग्राहकांना निवडीसाठी दुकानदाराकडून पुरविल्या जाणाऱ्या शेड कार्ड्सवर अवलंबून राहावे लागते. त्या उलट ‘इम्प्रेशन स्टाइल झोन’ या ‘नेरॉलॅक एक्स्पीरियन्स सेंटर’मध्ये पसंतीच्या रंगात आपले घर नेमके कसे दिसेल हे पाहणे-अनुभवण्याची संधी ग्राहकांना देणारी संकल्पना आहे. २,५०० चौरस फुटाच्या या केंद्रात घरातील सामानसुमानासह वेगवेगळ्या भिंतींसाठी वेगवेगळी रंगसंगती ही प्रत्यक्षात कशी दिसेल हे दाखविणारे खास विकसित त्रिमितीय सॉफ्टवेअर प्रणालीही बसविण्यात आली आहे. रंगकामाची प्रक्रिया, उपलब्ध उत्पादन प्रकार आणि फिनिशेस याचीही माहिती या केंद्रातून दिली जाते. कंपनीने दक्षिण भारतात दोन राज्यांमध्ये विक्री दालनांव्यतिरिक्त असणारी अशी ४० इम्प्रेशन स्टाइल झोन्स कार्यान्वित केली असून, लवकरच ती देशभरात सर्वत्र पाहायला मिळतील, असे मेहरोत्रा यांनी स्पष्ट केले.    

Story img Loader