सहकार क्षेत्रातील कपोल को-ऑपरेटिव्ह बँक वर्ष २०१३-१४ आपल्या स्थापनेचे हीरकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असून त्याची सुरुवात बँकेने ग्राहकांसाठी सहा नवीन योजना, डेबिट कार्डाचे तसेच बँकेच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण आणि बँकेच्या जनमानसातील सदिच्छादूत म्हणून अभिनेता दिलीप जोशी (‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे जेठालाल) यांच्या नियुक्तीसह केला. शुक्रवारी चर्चगेट येथील इंडियन र्मचट्स चेंबरच्या सभागृहात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, राज्यसभेचे खासदार वाय. पी. त्रिवेदी, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात या घोषणा करण्यात आल्या.
बँकेच्या महाराष्ट्रात १४ तर गुजरातमध्ये सूरत येथे एक शाखा सध्या कार्यरत आहे. बँकिंग सेवांमधील सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या कपोल बँकेने पंच्याहत्तरीपुढील नवीन वाटचालीसाठी नव्या बोधचिन्हाचा स्वीकार केला असल्याचे कपोल बँकेचे मानद अध्यक्ष के. डी. व्होरा यांनी सांगितले. तसेच बँकेचे अध्यक्ष प्रकाश सेठ यांच्या कल्पनेतून साकारलेल्या कपोल लखपती, कपोल जनता, कपोल प्रवासी कर्ज, कपोल मेरा घर, कपोल मोटर आणि कपोल आधार अशा विशेष ग्राहक योजनाही या निमित्ताने सुरू करण्यात आल्या. संपूर्ण भारतभरात कुठेही आर्थिक विनिमयासाठी वापरात येईल असे ‘रूपे डेबिट कार्ड’ही बँकेने प्रस्तुत केले.