रत्नागिरी व परिसरात झपाटय़ाने विकसित होत असलेल्या बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीचे एकत्रित दर्शन घडवणारा ‘कोकण वास्तू २०१४’ वास्तू महोत्सव येत्या शुक्रवारपासून (१९ डिसेंबर) शहरात सुरू होत आहे.
‘रत्नागिरी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स असोसिएशन’ आणि ‘केड्राई-रत्नागिरी’ यांच्यातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या महोत्सवाबाबत कार्यकारी अध्यक्ष महेंद्र जैन यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत रत्नागिरी शहर आणि परिसराचा विविध अंगांनी विकास होत आहे. फलोत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने मासेमारीबरोबरच गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने होत असलेला औद्योगिक विकास, शिक्षण संस्थांचे जाळे, चौपदरीकरण होत असलेला महामार्ग आणि कोकण रेल्वेबरोबरच खासगी बंदरांच्या विकासामुळे रत्नागिरी शहराच्या आधुनिकीकरणाचा वेग वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर शहराच्या भवतालच्या ग्रामीण भागातील जमिनीचे संपादन करून नियोजनबद्ध विकास केल्यास ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते.
कोकण तसेच मुंबई-पुणे व परदेशातील संभाव्य ग्राहकांनाही या प्रकल्पांची माहिती एकत्रितपणे मिळावी या हेतूने दोन वर्षांपूर्वी ‘कोकण वास्तू २०१२’ महोत्सव आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन येत्या १९ ते २१ डिसेंबर दरम्यान रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात यंदाचा ‘कोकण वास्तू २०१४’ हा महोत्सव होणार आहे. रत्नागिरी शहरातील अनेक गृहप्रकल्प, अंतर्गत सजावट, कलात्मक फर्निचर तसेच गृहकर्ज देणाऱ्या वित्त संस्थांची दालने या महोत्सवात असतील.