आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळ सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. नैतिकतेच्या कारणावरून त्यांनी हा राजीनामा दिल्याचे समजते.
आदित्य बिर्ला समूहाच्या प्रवक्त्याने या विषयावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. परंतु रिझव्‍‌र्ह बँकेच्या वेबस्थळावर संचालक मंडळाच्या सदस्यांच्या यादीतून बिर्ला यांचे नाव वगळण्यात आल्याचे दिसून येते. रिझव्‍‌र्ह बँकेकडे संभाव्य बँक परवान्यासाठी पात्र ठरलेल्या अंतिम २६ अर्जामध्ये आदित्य बिर्ला समूहातील ‘आदित्य बिर्ला नुव्हो लि.’ ही एक कंपनी आहे. अशा स्थितीत परवाने अदा करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर राहणे नैतिकतेला धरून होणार नाही, अशा भूमिकेतूनच बिर्ला यांनी हा राजीनामा दिला असल्याचे समजते.
आदित्य बिर्ला नुव्होकडून बँक परवान्यांसाठी अर्ज प्राप्त झाल्यावरच, रिझव्‍‌र्ह बँकेने बिर्ला यांच्या संचालक मंडळ सदस्यत्वाचा मुद्दा केंद्रीय अर्थखात्याला कळविला होता. गव्हर्नर डी. सुब्बराव यांनीही बिर्ला यांच्याबाबतीत पक्षपात होणार नाही, असा निर्वाळा अलीकडेच जाहीरपणे दिला होता, तर ११ जुलै रोजी कम्युनिस्ट पक्षाने औचित्याचा मुद्दा म्हणून ही बाब संसदेत उपस्थित केली होती. त्यामुळे या प्रश्नावरून वादंग टाळण्यासाठी कुमारमंगलम बिर्ला यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा