आशियाई देशांसाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या ‘ब्रिक्स बँके’च्या अध्यक्षपदी भारतीय बँक व्यवस्थेतील दशकाचा व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एशियन डेव्हलपमेन्ट बँकेचा अनुभव असलेल्या पद्मभूषण के. व्ही. कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बँकर म्हणून प्रसिद्ध असलेले ६७ वर्षीय कामत सध्या आयसीआयसीआय बँक व इन्फोसिसचे अ-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांचा यापूर्वी अन्य आशियाई देशांची आलेला संबंध उपयोगात येणार आहे.
१०० अब्ज डॉलरच्या या बँकेची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या विदेश दौऱ्यात करण्यात आली होती. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली ही बँक भारतासह आशियातील प्रमुख पाच देशांना पायाभूत सुविधेसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करून देणार आहे.
ब्रिक्सच्या रूपाने भारताला प्रतिनिधित्व करण्याचा पहिला मान मिळाला असून, कामत हे या पदाचा कार्यभार पुढील पाच वर्षे सांभाळतील. इन्फोसिसमधील पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नवी कारकीर्द सुरू होईल. कामत हे सध्या आयसीआयसीआय बँकेचे अ-कार्यकारी अध्यक्षही आहेत.
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण कोरिया या आशियातील विकसनशील देशांसाठी कार्यरत या बँकेचा प्रत्यक्ष कारभार येत्या वर्षभरात अस्तित्वात येणार आहे. तोपर्यंत ती नवी विकास बँक म्हणून कार्य करेल. बँकेचे मुख्यालय चीनमधील शांघाय येथे असेल.
गेल्या वर्षी ब्रिक्स देशांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्याच वेळी अशा प्रकारच्या बँकेला मूर्त रूप देण्याच्या त्यांच्या आग्रहाला अन्य देशांनीही संमती दिली. याचबरोबर बँकेचे मुख्यालय चीनला तर अध्यक्षपद भारताला देण्याबाबतही उभय देशांमध्ये सहमती झाली होती.
प्रत्येकी १० अब्ज डॉलरच्या निधी उभारणीसह ब्रिक्स बँकेची सुरुवात करण्यात आली आहे. तर त्यांचे एकूण भांडवल १०० अब्ज डॉलर असेल. ब्रिक्स देशांचे एकूण सकल राष्ट्रीय उत्पादन हे १६ लाख कोटी डॉलरचे असून जागतिक लोकसंख्येत या देशातील लोकसंख्या ४० टक्के हिस्सा राखते.
कामत यांच्या नियुक्तीचे तमाम भारतीय बँकिंग व्यवस्थेने स्वागत केले आहे. तसेच उद्योग संघटनांनीही कामत यांच्या रूपात भारताला आंतरराष्ट्रीय बँक स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.
डॉ. राजन यांना टाळले
रिझव्र्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या नावाची जोरदार चर्चा या बँकेच्या स्थापनेपासूनच सुरू होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अनुभव असलेल्या राजन यांची चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या पतधोरणापूर्वी रिझव्र्ह बँकेतून उचलबांगडी करून या बँकेवर पाठविण्याबाबत अंतिम निर्णय होत असतानाच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून राजन यांना ‘मुदतवाढ’ दिली होती. मुंबई दौऱ्यात मोदींना राजन यांचे कौतुकही केले होते.
१९७१ : आयसीआयसीआय समूह
१९८८ : एशियन डेव्हलपमेन्ट बँक
मे १९९६ : आयसीआयसीआय बँकेत व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी
मे २०११ : इन्फोसिसमध्ये
अ-कार्यकारी अध्यक्ष
मे २०१५ : ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष
नाव : कुंदपूर वामन कामत
वय : ६७ वर्षे (जन्म : २ डिसेंबर १९४७)
शिक्षण : उच्च शालेय – शिक्षण सेंट अलोयसूस कॉलेज, मंगलोर,
अभियांत्रिकी पदवी – केआयटी, कर्नाटक, पदवी प्रमाणपत्र – आयआयएम, अहमदाबाद.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा