नव्या आठवडय़ाची सुरुवात तब्बल ३५० हून अधिक अंश वाढीने करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी गेल्या तीन आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. यामुळे मुंबई निर्देशांकांने २७,५०० चा पुढचा पल्लाही सप्ताहारंभीच गाठला आहे.
३६३.३० अंश वाढीने सेन्सेक्स २७,६८७.३० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकांत सोमवारी शतकी भर पडली. यामुळे निफ्टीला ८,३०० चा पुढचा प्रवास नोंदविता आला. १११.३० अंश वाढीने निफ्टी ८,३७३.६५ वर पोहोचला.
यंदाचा मान्सून लवकर येण्याबाबत वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत देशाच्या वित्तीय तुटीचे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४ टक्क्य़ांपर्यंत राखण्याचे उद्दिष्ट सरकाने जाहीर केले आहे.
वेळेत येणाऱ्या मान्सूनचा वेधशाळेचा अंदाज आणि वित्तीय तुटीवर नियंत्रण राखण्याचे सरकारचे आश्वासन या जोरावर आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी प्रमुख भांडवली बाजार तेजीवर स्वार झाले. दोन्ही प्रमुख निर्देशांक सव्वा टक्क्य़ांपेक्षा अधिक वाढ नोंदविते झाले.
सोमवारच्या व्यवहाराची २७,४१६.९७ अंश अशी तेजीने सुरुवात करणारा सेन्सेक्स सत्रात २७,७२५.९७ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीनेही सोमवारच्या सत्रात ८,३०० चा टप्पा पार केला. निफ्टीचा सोमवारचा प्रवास ८,३८४.६० ते ८,२७१.९५ दरम्यान राहिला.
गेल्या दोन व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांकांची वाढ ही ४८१.२४ अंश राहिली आहे. सोमवारच्या तीन शतकी निर्देशांक वाढीने सेन्सेक्स आता २३ एप्रिलनंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबई निर्देशांक यापूर्वी २७,७३५.०२ पर्यंत गेला आहे.सोमवारी सेन्सेक्समधील तेल व वायू विक्री व विपणन क्षेत्रातील सरकारी कंपनी समभागांमध्ये खरेदी नोंदली गेली. यात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी यांचा क्रम राहिला. या समभागांतील वाढ ही जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंतची होती.
सेन्सेक्समधील केवळ तीन समभागांचे मूल्य रोडावले. यामध्ये हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी व कोल इंडिया यांचा क्रम राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक २.१६ टक्क्य़ांनी वाढला. रिझव्र्ह बँकेच्या येत्या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होणाऱ्या पतधोरणामुळे व्याजदराशी संबंधित समभागांनाही मागणी राहिली.
मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.९७ व ०.९८ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
सोमवारच्या व्यवहारावरून भांडवली बाजारात पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ दिसून आला.
तेल समभागांना मागणी
गेल्या आठवडय़ात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे सोमवारी तेल व वायू विपणन व विक्री क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये उठाव दिसून आला. या क्षेत्रातील प्रामुख्याने सरकारी कंपन्यांच्या समभागांचे मूल्य ४ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
एपीसीएल रु. ६२६.५० (+३.९३%)
बीपीसीएल रु. ७९१.०५ (३.३१%)
आयओसी रु. ३४५ (+२.६५%)
शुक्रवारी सरकारने पेट्रोलचे दर प्रति लिटर ३.१३ रुपयांनी तर डिझेलच्या किंमती लिटरमागे २.७१ रुपयांनी वाढविल्या होत्या. चालू महिन्यातील ही दुसरी दरवाढ होती. मेच्या सुरुवातीलाही लिटरसाठी ४ रुपयांपर्यंतची दरवाढ लागू करण्यात आली होती.