दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये चार नवीन औद्योगिक शहरे (ग्रीनफिल्ड ) विकसित केली जात असून तेथे मुख्य पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.
नव्याने वसविण्यात येणाऱ्या औद्योगिक शहरांमध्ये सुकाणू गुंतवणूकदारांना १३८ भूखंडांचे (७५४ एकर) वाटप करण्यात आले असून त्यांच्याकडून १६,७५० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. या सुकाणू गुंतवणूकदारांमध्ये दक्षिण कोरियातील ‘ह्योसंग’, रशियातील ‘एनएलएमके’, चीनमधील ‘हायर’चा समावेश आहे. तर देशातील ‘टाटा केमिकल’ आणि ‘अमूल’ने देखील मोठी गुंतवणूक केली आहे. या औद्योगिक कॉरिडॉरमधील सुमारे २३ प्रकल्पांच्या नियोजनाचे आणि विकासाचे काम प्रगतीपथावर असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
उद्योगांना दर्जेदार, विश्वाासार्ह आणि टिकाऊ सुविधा प्रदान करून देशातील उत्पादन गुंतवणूक सुलभ करण्यासाठी स्मार्ट औद्योगिक शहरे तयार करण्याचा ‘डीएमआयसी’चा उद्देश आहे. सरकारने अशा ११ कॉरिडॉरला मंजूरी दिली असून ज्यामध्ये ३२ प्रकल्पांचा समावेश आहे. ज्या चार टप्प्यामध्ये विकसित केल्या जाणार आहे. बेंगळुरू-मुंबई कॉरिडॉरअंतर्गत(बीएमआयसी), धारवाडचा वेगाने विकास करण्यात येणार असून यासाठी ६,००० एकर पेक्षा अधिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे.