जकातीसाठी पर्याय असलेल्या स्थानिक संस्था कर विरोधातील आंदोलनातील व्यापाऱ्यांच्या साथीला आता बिल्डर लॉबीचीही जोड मिळाली आहे. मुंबई शहरात १ ऑक्टोबरपासून येऊ घातलेल्या या नव्या कराविरोधात एक दिवसांचा बंद करण्याचा इशारा विकासकांनीही दिला आहे.नवा कर हा भ्रष्टाचाराचे कुरण ठरण्याची भीती व्यक्त करत ‘क्रेडाई’चे अध्यक्ष ललितकुमार जैन यांनी तो व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांच्या मुळावर उठणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ‘क्रेडाई’ ही देशातील ९ हजारांहून अधिक विकासकांचे नेतृत्व करते. विविध २० राज्ये आणि १२८ शहरातील या क्षेत्राशी संबंधित संघटनाही तिच्याशी संलग्नित आहेत. संघटनेबरोबर कुमार अर्बन डेव्हलपमेन्टचे अध्यक्ष असलेल्या जैन यांनी जकातीची भरपाई म्हणून मूल्यवर्धित कर वाढविण्याचा पर्याय सुचविला आहे. स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणी प्रक्रियेलाही त्यांनी विरोध दर्शविला आहे. बांधकाम आणि त्याच्याशी निगडित वस्तूंवर स्थिर एक टक्का कराबद्दलही त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे.
नव्या व्यावसायिकांचे खच्चीकरण करू पाहणाऱ्या या कराबद्दल मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून देशाच्या आर्थिक राजधानीतील निधीचा ओघ कायम राखण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवी मुंबईतील विकासकांनीही व्यापाऱ्यांच्या स्थानिक संस्था करविरोधातील आंदोलानाला पाठिंबा दिला आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडित अन्य व्यावसायिकही एक दिवसांचा बंद करणार असल्याचे एमसीएचआय-क्रेडाई रायगडचे अध्यक्ष राजेश प्रजापती यांनी जाहीर केले आहे.

Story img Loader