भारतात प्रथमच मधुमेहींच्या पायावर उपचार करणाऱ्या ‘डायपेड’ या ब्रॅण्डेड  दालनांची शृंखला ब्रिटनस्थित ‘अल्जिऑस’ ही कंपनी साकारत आहे. मुंबईत शुक्रवारी अशा पहिल्या ‘डायपेड’चा शुभारंभ राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते झाला. ‘अल्जिऑस’कडून मुंबईत अशी सात दालने देशभरात सुरू होत आहेत. यावेळी कंपनीचे अध्यक्ष जॉन शेरिडॅन आणि संचालक ह्युग शेरिडॅन हे उपस्थित होते.
दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इमारतीतील या दालनांसह उपनगरात सात ठिकाणी अत्याधुनिक यंत्र, बहुपयोगी उत्पादने, आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ यासह ‘डायपेड’ उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ‘अल्जिऑस इंडिया पेडोर्थिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण हेमाडे यांनी दिली. येत्या सहा महिन्यात महाराष्ट्रात पाच ठिकाणी तर दोन वर्षांमध्ये देशभरात १०० ‘डायपेड’ सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.
विविध कारणांनी पाय कापावे लागण्याचे सर्वाधिक प्रमाण हे मधुमेही रुग्णांमध्ये असून भारतासारख्या देशात प्रत्येक २२ सेकंदांना मधुमेहींना झालेल्या जखमेमुळे एक पाय कापला जातो. पायाच्या विकारामुळे मधुमेह अधिक बळावण्याचे प्रमाण अधिक आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या मधुमेही रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे  पायाच्या विकारामुळेच दाखल होतात.
‘अल्जिऑस’चे व्यवस्थापकीय संचालक भूपेन हेमाडी यांनी सांगितले की, मधुमेहींच्या पायांची नियमित तपासणी होऊन योग्य उपचार झाल्यास पाय गमावण्याचे प्रमाण कमी करता येते. मात्र अशा प्रकारची सुविधा भारतात एक ते तीन ठिकाणीच आहे. शिवाय उपचारादरम्यान लागणारी उत्पादने ही दक्षिण आफ्रिकेसारख्या शहरातून आयात करण्याचाच मार्ग उपलब्ध आहे. क्रीडापटू तसेच पालिकेच्या सहकार्याने आधार कार्डधारकांनाही या दालनातील उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. मधुमेही व पायाच्या आजारावर वैद्यकीय मार्गदशर्नावर आधारित नियतकालिकही सुरू करण्याचा मनोदय याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.    
मुंबई पोलिसांच्या पायांना स्पर्शच जाणवत नाही..
मुंबई पोलिसांसाठी घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात अधिकतर पोलिसांच्या पायांना स्पर्शाचे ज्ञानच होत असल्याचे निष्पन्न झाले होते. पाच वर्षांपूर्वी मुख्यालयासह मुंबईतील विविध पोलिस ठाण्यामध्ये मधुमेह झालेल्या १,५०० पोलिसांच्या पायाची तपासणी करण्यात आल्यानंतर पैकी ९०० पोलिसांच्या पायांना स्पर्श जाणवत नसल्याचे सिद्ध झाले होते. पोलिसांमध्ये वाढत्या मधुमेहासाठी अनियमित आहार, तंबाखू, दारुचे सेवन ही कारणे असल्याचे पुढे आले आहे.