युरोपीय कर्जदारांकडून आणखी मदतीसाठी घातल्या जाणाऱ्या अटींना झिडकारणारा ग्रीसमधील सार्वमताचा अपेक्षित कौल आला असला तरी या धनको संस्थांकडून सवलती पदरात पाडून घेण्यासाठी डावपेचांचा भाग म्हणून अर्थमंत्री जेनिस वारॉफकिस यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने युरोपीय नेत्यांना धक्का बसला आहे. ग्रीसला आणखी मदत देण्यासाठी कर्जदारांनी काटकसरीची अट घातली होती ती सार्वमतात ग्रीसच्या जनतेने फेटाळली आहे. त्यामुळे ग्रीस आता युरोझोनमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
अर्थमंत्री वारॉफॉकिस यांचे गेल्या महिनाभरातील वाटाघाटीत अनेकदा कर्जदारांशी मतभेद झाले होते. काही युरोपगटांना व भागीदारांना वाटाघाटींच्या बैठकीत आपला सहभाग नको होता. पंतप्रधान सिप्रास यांना कदाचित समझोता होण्यासाठी आपण राजीनामा देणे योग्य वाटले असेल त्यामुळे आपण अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देत आहोत.
अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर युरो चलन वधारले असून युरोपीय मदत यंत्रणा, युरोपीय समुदाय व नाणेनिधी या कर्जदारांना पुन्हा वाटाघाटीसाठी राजी करणे शक्य असल्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. ग्रीसच्या जनतेने सुधारणांना नकार दिला असून त्यामुळे ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात असताना पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल या पॅरिसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ओलाँदे यांची भेट घेणार असून सार्वमताचे परिणाम कमीत कमी कसे राहतील यासाठी प्रयत्न करणार आहेत. हे सार्वमत म्हणजे युरोपपासून काडीमोड घेणे नाही, असे ग्रीसचे पंतप्रधान सिप्रास यांनी म्हटले आहे.
युरोपीय समुदायाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, युरोझोन शिखर बैठक उद्या होत आहे. विश्लेषकांच्या मते ग्रीस युरोझोनमधून बाहेर जाण्याची शक्यता अधिक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा