सरकारी हिस्सा कमी करण्यासाठी असो अथवा सार्वजनिक कंपन्यांची भागविक्री प्रक्रिया, ऐनवेळी मदतीचा हात ठरणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळाने गेल्या तिमाहीत भांडवली बाजारातून मोठय़ा प्रमाणात काढता पाय घेतला आहे.
महामंडळ अर्थात एलआयसीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ या दरम्यान १२,६०० कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. ते प्रामुख्याने वित्त, वाहन, औषध कंपन्यांचे आहेत. तुलनेत महामंडळाने याच कालावधीत ३,८७७ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. ही गुंतवणूक ऊर्जा, पोलाद, खनिकर्म आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमधील आहे.‘
‘बँक ऑफ अमेरिका – मेरिल लिंच’ने याबाबत जारी केलेल्या एका अहवालानुसार, एलआयसीने प्रामुख्याने खाजगी कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी समभाग विक्रीच्या रुपाने कमी केली आहे.
महामंडळाने अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, महिंद्र अॅण्ड महिंद्र या कंपन्यांमधील समभाग विकले आहेत. तर रिलायन्स पॉवर, इन्फोसिस, केर्न इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी कंपन्यांचे समभाग खरेदी केले आहेत.
तुलनेने चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत महामंडळाने यापेक्षा कमी समभाग विक्री तसेच खरेदी केली होती.
समभाग विक्री समभाग खरेदी
अॅक्सिस बँक ४,८११.४० रिलायन्स पॉवर १,०९६.२०
महिंद्र अॅण्ड महिंद्र ९५५.८० इन्फोसिस ८७४.८०
एचडीएफसी बँक ८४७.८० केर्न इंडिया ८१०.००
सन फार्मा ८३१.६० रिलायन्स इंडस्ट्रीज ७६६.८०
आयसीआय. बँक ७८३.०० आयटीसी ५०७.६०
(रक्कम कोटी रुपयांमध्ये)