समाजाने मूल्यनिर्मिती ही तत्त्वनिष्ठा आणि गांधीवादी तत्त्वज्ञानाची कास धरूनच करता येईल. म्हणूनच खरे तर आजच्या घडीला जीवनाचा पुरेपूर अनुभूती अर्थात ‘लाइफ-एक्स’ हा शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ निर्देशांकापेक्षा खूप अधिक महत्त्वाचा ठरायला हवा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी केले. वरळीच्या सास्मिरा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज्च्या वतीने मंगळवारी आयोजित राष्ट्रीय वित्त परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अर्थकारणाच्या आगामी दिशेचे विश्लेषण करणाऱ्या या परिषदेसाठी सास्मिराच्या सभागृहात जमलेल्या श्रोतृसमुदायाला संबोधित करताना, टोपे यांनी आपल्या खुमासदार भाषणात अनेक कथा-अनुभवांची उत्तम पेरणी केली. सास्मिरासारख्या संस्था या जगातील अग्रेसर संस्था बनायला हव्यात. पण त्यासाठी कठीण परिश्रमाबरोबरच कालसुसंगत धोरण व व्यूहनीतीकडे लक्ष दिले जायला हवे, असे त्यांनी आवाहन केले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते सास्मिरा वार्षिकांकाचेही विमोचन करण्यात आले. व्यासपीठावर त्यांच्या सोबत सास्मिराचे अध्यक्ष मगनलाल दोषी आणि कार्यकारी संचालक यू. के. गंगोपाध्याय आणि उपाध्यक्ष मिहीर मेहता उपस्थित होते.

Story img Loader