आगामी काळात पतधोरणात नरमाई अथवा शिथिलतेला अत्यंत मर्यादित वाव असल्याचे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मॉस्को येथे सोमवारी केले. जी-२० राष्ट्रगटातील अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची येथे भरलेल्या बैठकीत सुब्बराव बोलत होते.
गेल्या दोन महिन्यांचे महागाई दराचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. डिसेंबर महिन्यात महागाई कमी झाली तर जानेवारी महिन्यात ७ टक्क्यांहून अधिक महागाईचे आकडा भडकण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात तो ६.६ टक्के वाढीचा आला. आगामी मार्चमध्येही महागाई दर याच पातळीवर अपेक्षित आहे, असे सुब्बराव यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. तथापि यावर्षी वित्तीय तूट ही दशकातील सर्वात जास्त पातळीवर असेल, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी अर्थसंकल्पात वित्तीय तूट कमी करण्याबरोबर सरकार विकासाला अनुकूल अशी धोरणे कशी आखते त्यानुसार रिझव्‍‌र्ह बँक मार्च महिन्यात जाहीर होणाऱ्या पतधोरणात अपेक्षित बदल नक्कीच करेल. रुपयाची स्थिरता, परदेशी व्यापारातील तूट व वित्तीय तूट यांचा समतोल साधत आगामी काळात रिझव्‍‌र्ह बँक आपल्या धोरणाची दिशा ठरवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader