दररोज नव्याने उत्क्रांत होत असलेले तंत्रज्ञान समजून घेण्यापेक्षा नवीन भाषा शिकणे जास्त सोपे आहे, असा निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणाने जनमताचा घेतलेला कानोसा सांगतो. म्हणूनच आधुनिक माहिती-तंत्रज्ञान सर्वाना सहजसाध्य व्हायचे तर त्याचा तोंडावळा त्या त्या प्रदेशांच्या भाषेतून व्हायला हवा, असे साधे व्यवसाय धोरण ठेवून ‘लिंग्वानेक्स्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि.’ या पुण्यात मुख्यालय असलेल्या तंत्रज्ञान कंपनीला आगामी काळात उमदे भवितव्य दिसून येत आहे.
‘लिंग्वानेक्स्ट’ ही कंपनी ईआरपी सोल्युशन्सचे विविध भाषांमध्ये स्थानिकीकरण करणारी आगळी व्यवसाय धाटणी असलेली कंपनी असून, ती सध्या विविध १८ भारतीय भाषांमध्ये तसेच १५ बिगर भारतीय जागतिक भाषांमध्ये कार्यरत आहे. देशातील जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँका व नाबार्डसारखी वित्तसंस्था, ग्राहकांशी थेट संबंध येणारे सरकारी उपक्रम, विमा कंपन्या, ‘अमूल’सारखी दुग्ध सहकार क्षेत्रातील अग्रेसर नाव आणि नाशिक महानगरपालिकासारख्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आजच्या घडीला लिंग्वानेक्स्टच्या ग्राहक आहेत. पालिका-नगरपालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे संगणकीकृत देयके, उतारे अथवा प्रमाणपत्र ही त्या त्या भाषेतून देऊन नव-तंत्रज्ञानाविषयी लोकांच्या मनातील अडी दूर करण्याचे काम आपल्या या सेवांतून साधले जाते, असे लिंग्वानेक्स्टचे मुख्य परिचालन अधिकारी जगदीश सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
भारताचे आयटी क्षेत्र हे प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञानाधारीत सेवा प्रदात्या कंपन्यांचीच प्रामुख्याने व्यापले आहे या क्षेत्रातील ‘मेड इन इंडिया- प्रॉडक्ट्स’चा कित्ता लिंग्वानेक्स्टसारख्या कंपनीकडून निर्माण केला जात आहे. लिंग्वानेक्स्ट ही आजच्या घडीला ‘एसएपी (सॅप)’ या जागतिक तंत्रज्ञान कंपनीची आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील एकमेव प्रॉडक्ट भागीदार कंपनी आहे. भारतात ई-प्रशासनामध्ये विविध उपक्रमांकडून मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली जात असून, ‘सॅप’च्या उपाययोजनांना वाढती मागणी आहे आणि ‘सॅप’च्या सेवा इंग्रजीव्यतिरिक्त भारतीय भाषांमधून उपकारक ठरावयाच्या झाल्यास त्या उपक्रमांना ‘लिंग्वानेक्स्ट’च्या सेवाही बरोबरीने घेणे क्रमप्राप्त ठरत आहे. देशातील ई-प्रशासन सेवा क्षेत्राची बाजारपेठ सध्या रु. २२,००० कोटींची आहे आणि त्यातील सॅप, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट वगैरेंच्या सॉफ्टवेअरचा घटक २५ टक्के गृहित धरल्यास, विविध भाषांमध्ये स्थानिकीकरणावर त्यापैकी २५ टक्के खर्च करावा लागेल. अशा तऱ्हेने देशात लिंग्वानेक्स्टसारख्या कंपनीच्या सेवांसाठी रु. १४०० कोटींचे प्रांगण खुले झाले आहे. या पाश्र्वभूमीवर सात वर्षांपूर्वी स्थापित कंपनीने आगामी दोन वर्षांत किमान २०० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य निर्धारीत केले आहे, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. सध्याच्या तुलनेत कंपनीच्या उत्पन्नातील ही दसपटीने वाढ असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा