अपेक्षेप्रमाणे देशाच्या परकीय व्यापारातील तुटीला वर्षांरंभी बांध घातला गेला आहे. परंतु आयातीप्रमाणे निर्यातही तितक्याच प्रमाणात घसरली असल्याचे शुक्रवारी जाहीर झालेली आकडेवारी दर्शविते.
जानेवारी २०१५ मध्ये व्यापार तूट ८.३२ अब्ज डॉलर राहिली असून ती आधीच्या महिन्याच्या (डिसेंबर २०१४ : ९.४० अब्ज डॉलर), तसेच वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीच्या (जानेवारी २०१४ : ९.९० अब्ज डॉलर) तुलनेत खूपच कमी आहे.
जानेवारी २०१५ मध्ये भारताची आयात ११.३९ टक्क्य़ांनी कमी होत ३२.२० अब्ज डॉलर राहिली आहे. तर याच महिन्यात निर्यातही ११.१९ टक्क्य़ांनी रोडावत २३.८८ अब्ज डॉलरवर आली आहे. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत आयात २.४४ तर निर्यात २.१७ टक्क्य़ांनी वाढली आहे.
एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंत देशाची व्यापार तूट ११८.३७ अब्ज डॉलर राहिली आहे. आधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षांत ती १३८.६० अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.
कच्चे तेल िपपामागे पुन्हा ६० डॉलरवर!
लंडन: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा उचल घेत, ते प्रति पिंप ६० डॉलरवर गेले आहेत. २०१५ सालातील हा त्यांच्या किमतीचा सर्वोच्च टप्पा आहे. आठवडय़ाभरात किमती तब्बल ४ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. जून २०१४ च्या सुमारास प्रति पिंप ११५ डॉलर असणाऱ्या कच्च्या तेलाचे दर गेल्या काही महिन्यांपासून तीव्र रूपात घसरले होते. २०१५ च्या सुरुवातीला तर ते ४५ डॉलर प्रति पिंपापर्यंत आले. सहा महिन्यांतील तेलाचा उतार हा ५० टक्क्य़ांपेक्षाही अधिक राहिला आहे. दरातील ताजी वाढ ही अमेरिकेमार्फत तेलपुरवठा कमी होण्याच्या शक्यतेमुळे असल्याची मानले जाते. इंधन उत्पादनात स्वयंपूर्ण होऊ पाहणाऱ्या अमेरिकेच्या तेल उत्पादन क्षेत्रांची संख्या जानेवारीत २०० ने कमी झाल्याचा अहवाल येऊन धडकला आहे. अमेरिकेमार्फत तेल उत्पादन घसरणार असताना आखातातील तेल उत्पादकांनी नियमित उत्पादन घेण्याचे ठरविले होते.

Story img Loader