आठवडय़ाची मुलाखत : संपत रेड्डी, मुख्य गुंतवणूक अधिकारी, बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स

शेअर बाजारात चढ-उतार हे कायम सुरू असतात, विशेषत: येत्या महिन्याभरातील विविध देशी व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर हे चढ-उतार खूपच तीव्र स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. परंतु सामान्य गुंतवणूकदारांनी सकारात्मक दृष्टिकोनाने दीघरेद्देशी गुंतवणूक केल्यास ती फलदायी ठरेल. सध्या बाजारात गुंतवणुकीवर परताव्याच्या सर्वोत्तम शक्यता आजमावायच्या असतील तर किमान तीन वर्षे गुंतवणूक हवी, असे बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी संपत रेड्डी यांचे म्हणणे आहे.

  • बाजाराचा सध्याच्या मूडबद्दल काय सांगाल? आगामी कल ठरविणारे महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या?

– बाजाराचा एकंदर मूड सकारात्मकच आहे. ज्या कंपन्यांनी तिमाहीत चांगले निकाल दिले त्यांना बाजाराने उचलून धरले आणि गुंतवणूकदारांच्या पदरी भरभरून परताव्याचे त्यांनी माप ठेवल्याचे दिसून येते. कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीत उभारी, सातव्या आयोगातून झालेली वेतनवाढ बरोबरीने चांगल्या मान्सूनच्या परिणामी ग्रामीण भागातूनही आलेली मागणीतील सुगी या बाबीही कंपन्यांच्या कामगिरीतील सुधारणेच्या पथ्यावर पडल्या आहेत. तरीही येत्या आठवडय़ात अमेरिकेतील निवडणुकांचा कौल बाजाराच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने लक्षणीय ठरेल. अमेरिकी फेडच्या व्याज दरवाढीचा वेग, आयात होणाऱ्या जिन्नसांच्या किमती यातून भारतासह उदयोन्मुख बाजारातील गुंतवणुकीचा ओघ प्रभावित होईल.

  • अमेरिकेतील निवडणुकांच्या कौलाचा आपल्या बाजारावर कितपत व कसा परिणाम संभवतो?

– उभारी घेत असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक धोरणात सातत्य किंवा किमान आहे त्या दराने सुस्थिर वाटचाल हवी असल्यास विद्यमान डेमॉक्रॅटिक पक्षाचा अर्थात हिलरी क्लिंटन यांचा विजय बाजाराच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आहे. त्या उलट डेमॉक्रॅटिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची सरशी ही सबंध जागतिक बाजारासाठी वादळी ठरेल.

  • जीएसटीच्या अंमलबजावणीच्या वाटचालीत या नवीन कराचा दर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, या घडामोडीचे बाजारावर कशा प्रकारचे परिणाम होताना आपण पाहता? जीएसटी परिषदेतून नेमक्या कोणत्या दरावर सहमतीची अपेक्षा करता येईल?

– जीएसटीची अंमलबजावणी ही बाजाराने गृहीत धरली असून, त्याचे समभागाच्या मूल्यवाढीत प्रत्यंतरही दिसले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी फारसा परिणाम दिसून येणार नाही. सध्या जशी चर्चा सुरू आहे, त्यानुसार वेगवेगळ्या वस्तू व सेवांची वेगवेगळी वर्गवारी करून त्यासाठी वेगवेगळ्या करांच्या दराचा प्रस्ताव पुढे आला आहे. तसे झाले तरी वावगे नाही, परंतु निश्चित अभिप्राय देण्यापूर्वी प्रत्येक वर्गवारीतील उत्पादने व सेवांचा तपशिलाने वेध आवश्यक ठरेल. ज्यायोगे लाभार्थी कंपन्यांच्या निर्णयावर येता येईल.

  • यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून कोणत्या प्रमुख आर्थिक सुधारणा/ निर्णयांची अपेक्षा करता येईल काय?

– केंद्र सरकारने जरी आधीच आश्वासन दिले असले तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची भांडवली पूर्तता तत्परतेने व वाढीव स्वरूपात केली जायला हवी. बँकिंग क्षेत्रावरील कर्जबुडीताचा (एनपीए) ताण बहुतांश निवळत चालला आहे. एनपीएमध्ये यापुढे नव्याने भर पडण्याची शक्यता मावळली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कारभार सक्रियता आणि मोजक्याच बँका राहतील असे त्यांचे विलीनीकरण ही काळाची गरज आहे. तसेच जीएसटीच्या अंमलबजावणीतील विविध टप्प्यांबाबत पडणारे प्रत्येक पाऊल बाजाराला सुखावणारे ठरेल.

  • सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी कोणत्या उद्योग क्षेत्राबाबत आपण सकारात्मक आहात?

– खासगी बँका, धातू, वाहन व वाहनपूरक उद्योग, तेल व वायू क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतात. सॉफ्टवेअर सेवा क्षेत्राचे मूल्यांकनही गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

  • छोटय़ा गुंतवणूकदारांचा पवित्रा काय असावा?

– विविध महत्त्वाच्या घडामोडींची तड लागणार असल्याने बाजाराचा हा येता काळ अनिश्चिततेने घेरलेला असेल. निर्णायक स्वरूपात उलटफेराची शक्यता नाकारता येत नाही. तथापि वैयक्तिक छोटय़ा गुंतवणूकदारांचा कल सकारात्मकच हवा. बाजाराचे टायमिंग (वेळ) साधण्याचा भलता नाद त्यांनी टाळलेला बरा. सध्या बाजारात गुंतवणुकीवर परताव्याच्या सर्वोत्तम शक्यता आजमावायच्या असतील तर किमान तीन वर्षे गुंतवणूक हवी. ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने अथवा एसआयपी पद्धतीने नियमित होत राहिल्यास उत्तमच!