सध्याच्या आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणातही उद्योगासारख्या क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभे राहण्याचे प्रेरणादायी विचार ‘लोकसत्ता’ पुरस्कृत एका कार्यक्रमात रविवारी मुंबईकर उद्योजकांना मिळाले. रविवारी मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या अनुभवी व्यक्तींकडून तरुणाईला उद्योजक होण्याचा मूलमंत्र यावेळी देण्यात आला. परिवर्तन- एक बदल, बालाजी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मैत्रेय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास या वेळी हजारांहून अधिक उत्सुकांनी उपस्थिती दर्शविली.
‘निर्माण ग्रुप’चे राजेंद्र सावंत, ‘सॅटर्डे क्लब’चे अध्यक्ष माधवराव भिडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राजेंद्र सावंत यांनी ‘उद्योगाची सुरुवात व वाढ’ या विषयावर, तर ‘बिझनेस डेव्हलपमेन्ट कन्सल्टन्ट’चे कुंदन गुरव यांचे ‘उद्योगधंदा का व कशासाठी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. ‘पितांबरी उद्योग समूहा’चे रवींद्र प्रभुदेसाई यांचे ‘मार्केटिंग व ब्रॅण्डिंग’ या विषयावर; तर ‘तळवलकर्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर तळवलकर यांचे ‘बिझनेस फिटनेस’ या विषयावरील मार्गदर्शन उपस्थितांना मिळाले. डॉ. पवन अग्रवाल यांनी ‘वेळेचे व्यवस्थापन’ व ‘सॅटर्डे क्लब’चे सरचिटणीस रोहित राऊळ यांनी ‘नेटवर्किंग’वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात याप्रसंगी उद्योग क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या अनेकांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे हरी पवार, नरहरी आवटी यांनीही उपस्थिती दर्शविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा