जागतिक अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन असलेल्या चीनची जागा घेण्यास आर्थिक विकास दर वाढत असलेल्या भारताला अजून बराच वेळ लागेल. जगातील सर्व आर्थिक समस्यांना चीनमधील घडामोडी कारणीभूत नाहीत त्याला इतरही कारणे आहेत, असे मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी येथे व्यक्त केले.
चीनमध्ये आर्थिक पडझडीला सुरुवात झाल्यानंतर त्याचे पडसाद जगाच्या बाजारपेठांमध्ये उमटत आहेत. या परिस्थितीत भारताने चीनची जागा घेऊन जगाचे विकास इंजिन बनण्याची संधी साधून घ्यावी, अशा व्यक्त होत असलेल्या मतप्रवाहाच्या पाश्र्वभूमीवर राजन यांचा हा अभिप्राय विशेष महत्त्वाचा आहे.
चीनऐवजी भारत जगाचे विकासाचे इंजिन होईल काय, असे ‘बीबीसी’ने मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर राजन म्हणाले, ‘भारताने आर्थिक विकास दरात तूर्तास चीनला मागे टाकले, तरी फार फरक पडणार नाही. जागतिक बँकेच्या माहितीनुसार अमेरिकेचे एकूण देशांतर्गत उत्पन्न १७ लाख कोटी डॉलर, चीनचे १० लाख कोटी डॉलर तर भारताचे २ लाख कोटी डॉलर आहे. हे पाहता भारताला जगाचे विकासाचे इंजिन होण्यास फार वेळ लागेल.’
सोमवारी आर्थिक बाजारपेठा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला होता. सध्याचा आर्थिक पेचप्रसंग भारताने संधीत परिवर्तित करावा असेही त्यांनी म्हटले होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले, की जागतिक बाजारपेठेत उलथापालथ झाली तरी आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही उलट त्यामुळे भारताला आर्थिक सुधारणा करून पुढे जाण्याची संधी आहे. सध्या जगाचे जे आर्थिक इंजिन आहे ते फार वेगात चालत नाही, अशी स्थिती आहे त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला नवीन विकास इंजिनाची गरज आहे. गेल्या काही वर्षांत चीनचा जगाच्या आर्थिक वाढीतील वाटा निम्मा होता, आता भारताचा आर्थिक विकास दर ७ ते ८ टक्के आहे, बाकी सगळे मागे पडले आहेत.
राजन यांनी सांगितले, की चीन हा मोठा देश आहे व त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान महत्त्वाचे आहे, जगात कुठेही पडझड झाली, तरी त्याचे परिणाम जगातील इतर देशात होणारच आहेत. जागतिक बाजारपेठेतील सगळ्या प्रश्नांचे कारण चीनमधील घडमोडी हे आहे असे समजणे चुकीचे आहे. कारण त्याला इतरही कारणे आहेत. राजन यांनी २००७-०८ मधील जागतिक आर्थिक समस्येचे भाकीत आधीच केले होते त्यामुळे त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून प्रतिमा आणखी उंचावली होती.
राजन म्हणाले, की आपण पुन्हा आर्थिक संकटाच्या दिशेने जात आहोत असे दर्शवणारी कुठलीही कारणे आपल्याला दिसत नाहीत पण काही वर्षांपूर्वी जे घडले होते तसे पुन्हा घडू नये यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. मध्यवर्ती बँका व आर्थिक संस्थांवर जागतिक आर्थिक प्रश्न सोडवण्याचे ओझे टाकणे योग्य नाही कारण त्याचे परिणाम चांगल्यापेक्षा वाईटच अधिक असतील. भारतात परिस्थिती वेगळी असून चलनवाढीसारखे प्रश्न अजून आहेत.
रुपयाच्या निर्यातपूरक ‘अवमूल्यना’ला विरोधच!
मुंबई: देशांतर्गत चलनाचे मूल्य कमी करून निर्यात व्यापाराला चालना देण्याच्या जगभरात विविध राष्ट्रांमध्ये सुरू असलेली चढाओढीत भारतानेही रुपयाचे अवमूल्यन करून सहभागी होण्याच्या आपण विरोधात असल्याचे राजन यांनी अन्य एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. असे स्पर्धात्मक चलन अवमूल्यन गत काही काळापासून युरोपीय संघात, जपान आणि आता चीनमध्ये सुरू झाले आहे, त्याविरूद्ध आपला टीकात्मक रोख राजन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केला. त्या उलट भारतात अर्थव्यवस्थेला मजबूत पाया उभे करून स्पर्धाशील बनविण्याचे उपाय योजायला हवेत, अशी त्यांनी पुस्ती जोडली. २०१३ सालात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या तुलनेत आपली सद्यस्थिती खूपच सुदृढ असल्याची त्यांनी ग्वाहीही दिली. आपणहून चलनाचे विनिमय मूल्य कमी करून विदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रतिकूलता ओढवून घेणेही हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा