सद्य:स्थितीत रुपयाच्या घसरत्या मूल्याची चिंता नसल्याचा अर्थमंत्र्यांचा निर्वाळा
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती किरकोळ वाढल्या तरी त्याचा फारसा परिणाम भारतावर होणार नाही; मात्र ही वाढ मोठी ठरल्यास ती देशाकरिता मोठी समस्या बनण्याची भीती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
जागतिक स्तरावर गेल्या काही दिवसांपासून खनिज तेलाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ३५ ते ४० डॉलर प्रति पिंप राहणारे तेलाचे दर पुन्हा एकदा ४० डॉलर प्रति पिंपपल्याड पोहोचू पाहत आहेत. या पाश्र्वभूमीवर तेलाचे सध्याचे दर थोडेफार वाढले तरी येथील अर्थव्यवस्थेवर त्याचा फार फरक पडणार नाही; मात्र ते मोठय़ा फरकाने वाढले तर भारतासाठी आव्हानात्मक स्थिती निर्माण होईल, असे जेटली म्हणाले.

रुपयाचे आव्हान नाही
डॉलरच्या तुलनेत गेल्या काही सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या रुपयाचे अर्थव्यवस्थेपुढे कोणतेही आव्हान नसून स्थानिक चलन पुन्हा एकदा त्याच्या पूर्वीच्या भक्कम स्तरावर पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. रुपया पुन्हा एकदा त्याचे सुसह्य़ स्थान प्राप्त करेल, असे स्पष्ट करत याबाबत अर्थव्यवस्थेपुढे कोणतेही आव्हान नसल्याचे जेटली यांनी नमूद केले. जागतिक स्तरावरही त्या त्या देशांच्या स्थानिक चलनात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे; मात्र तेथेही ही स्थिती आता सुधारत असल्याचे मत जेटली यांनी नोंदविले आहे. भारतीय चलनाची स्थिती तर गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत खूपच चांगली असल्याचेही त्यांनी नमूद केले. चीनने त्यांच्या युआन चलनाचे अवमूल्यन केले असताना भारतीय रुपया ऑगस्ट २०१५ पर्यंत हा गेल्या एक-दीड वर्षांत भक्कमच होता, असेही ते म्हणाले.

विकास दराबाबत..
जागतिक स्थिती भारताच्या विकास दराला हातभार लावत नसल्याचे नमूद करत आंतरराष्ट्रीय अस्थिर अर्थव्यवस्था स्थिरावताच देशाच्या विकासाचा वेग पुन्हा एकदा दिसू लागेल, असे मत जेटली यांनी व्यक्त केले. भारताप्रमाणेच अन्य देशांच्या अर्थव्यवस्थाही विकास दराबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे नमूद करून अर्थमंत्र्यांनी पूरक अर्थव्यवस्था, सरकारचा विकासावरील खर्च, थेट विदेशी गुंतवणूक, रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत होणारी व्याजदर कपात हे भारताचा विकास दर ७ टक्क्यांपेक्षा अधिक राखण्यास साहाय्यभूत ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.