बांधकाम व अभियांत्रिकी क्षेत्रातील महाकाय कंपनी लार्सन अँड टुब्रोने आपले माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील अंग असलेल्या एल अँड टी इन्फोटेकचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून, या कंपनीच्या समभागांच्या खुल्या भागविक्रीपश्चात शेअर बाजारात सूचिबद्धतेचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबपर्यंत कंपनीच्या समभागांच्या सूचिबद्धतेचा निश्चित कार्यक्रम योजण्यात आला आहे.
लार्सन अँड टुब्रोचे संपूर्ण अंगीकृत घटक असलेल्या एल अँड टी इन्फोटेकची नऊ सेवा केंद्रे देशभरात फैलावली असून, शेव्हरॉन, फ्रीस्केल, हिताची, सान्यो आणि लाफार्जसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना तिच्याद्वारे सेवा पुरविली जात आहे. सुमारे ५,१५० कोटी रुपयांच्या (८१० दशलक्ष अमेरिकी डॉलर) उलाढालीवर एल अँड टी इन्फोटेकने २०१४-१५ आर्थिक वर्षांत ७६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
मूळ प्रवर्तक या नात्याने लार्सन अँड टुब्रोद्वारे भागविक्री प्रक्रियेतून एल अँड टी इन्फोटेकमधील १० टक्के भागभांडवल सौम्य केले जाईल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.
सर्व अत्यावश्यक सोपस्कार पूर्ण करून येत्या नोव्हेंबरमध्ये, फार तर डिसेंबरमध्ये एल अँड टी इन्फोटेकची खुली भागविक्री योजण्यात येईल, असा नाईक यांनी विश्वास व्यक्त केला. लार्सन अँड टुब्रोच्या विद्यमान भागधारकांच्या दृष्टीने आकर्षक ठरेल, असे मूल्यांकन या आयटी सेवा अंगांच्या समभागांना निश्चितच मिळेल, असे नमूद करीत त्यांनी अन्य तपशील देण्यास नकार दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा