कोलकाता येथे मुख्यालय असलेली आणि आघाडीची अंतर्वस्त्र निर्माता कंपनी असलेल्या लक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मंगळवारी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचिबद्धतेसह पदार्पण केले. कंपनीचे हे हीरक महोत्सवी वर्ष असून प्रादेशिक शेअर बाजारातून प्रमुख बाजारात झालेल्या या संक्रमणाने कंपनीच्या सध्याच्या व संभाव्य भागधारकांना अधिक रोखता पुरविली जाणार आहे. पहिल्या दिवशीच्या एकूण बाजारातील अस्थिर व्यवहारात लक्सच्या समभागाने ३९०५ रुपयांच्या उच्चांकाला गवसणी घालून ३७८१ रुपयांवर विश्राम घेतला. समभागाने ३६६० रुपयांवरून दिवसाचे व्यवहार सुरू केले होते. राष्ट्रीय शेअर बाजारात हा समभाग गेल्या वर्षी सूचिबद्ध झाला आहे.
कंपनीने पश्चिम बंगालमधील सिरामपूरजवळ पाच लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळावर जागतिक दर्जाचा एकात्मिक होजिअरी उत्पादन प्रकल्प व गोदामाची उभारणी प्रस्तावित केली आहे. येत्या पाच वर्षांत विक्री जाळे मजबूत बनविताना, अंदाजे ५० हजार अतिरिक्त विक्रेत्यांची देशस्तरावर भर घातली जाईल, असे लक्स इंडस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप के. तोडी यांनी सांगितले. देशांतर्गत वस्त्रोद्योग गेल्या काही वर्षांत एक अंकी वृद्धीदराने वाटचाल करीत असताना, लक्सने गत पाच वर्षांत सरासरी २२ टक्के चक्रवाढ दराने प्रगती साधली आहे. २०१४-१५मध्ये कंपनीच्या विक्री महसुलात निर्यातीचा वाटा १३ टक्क्य़ांपर्यंत वाढला आहे. व्हीसी कॉर्पोरेट अ‍ॅडव्हायजर्स प्रा. लि.ने सूचिबद्धता प्रक्रियेत लक्सची सल्लागार म्हणून काम पाहिले.

Story img Loader