जागतिक प्रतिष्ठेची वित्तीय सेवा संस्था ‘मक्वायरी सिक्युरिटीज’ने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा पूर्वी अंदाजलेला ६.२ टक्क्यांचा विकास दर गुरुवारी नव्याने व्यक्त केलेल्या भाकितात ५.३ टक्क्यांवर खालावेल असे म्हटले आहे. रुपयाच्या स्थिरतेसाठी वाणिज्य बँकांकडील रोखीला चाप लावणाऱ्या योजलेल्या उपाययोजना आणि विदेशी वित्ताचे देशातून वेगाने सुरू असलेले पलायन याचे देशाच्या अर्थव्यवस्थेला विपरीत परिणाम भोगावे लागतील, असे कयास बांधत अनेक आघाडीच्या वित्तसंस्था व दलाल पेढय़ांनी गेल्या दोन दिवसांत विद्यमान आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचे अंदाज खालावले आहेत.
बँकिंग व्यवस्थेतील रोकडसुलभता शोषून घेणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे ताजे उपाय म्हणजे भारताने पुन्हा आर्थिक विकासाऐवजी वित्तीय स्थिरतेला प्राधान्य देणारे वळण घेतल्याचे सुस्पष्ट संकेत असून, मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात कपात लांबणीवर पडेल हेही यातून स्पष्ट होते. या बाबी आधीच मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला नजीकच्या काळात उभारी मिळणे शक्य नसल्याचे दर्शवितात, असे मॅक्वायरी सिक्युरिटीजने ताज्या अहवालात म्हटले आहे.
विदेशी भांडवलाचा ओघ हा देशांतर्गत धोरणाऐवजी जगभरात आर्थिक आघाडीवर काय घडते यावर अवलंबून राहावा अशा स्थितीत आपण सध्या आहोत, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल-लिंचने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या संस्थेनेही आर्थिक विकासदराबाबत ५.८ टक्क्यांचा पूर्वी व्यक्त केलेला अंदाज कमी करीत ५.५ टक्क्यांवर आणला आहे.   सरकारने संरक्षण क्षेत्र, दूरसंचार, विमा क्षेत्रात वाढीव विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मंगळवारी सायंकाळी निर्णय घेऊन सुकर केला. ही बाब स्वागतार्ह असली तरी या आर्थिक सुधारणा खूप उशिराने आल्या असल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.