आरोग्यास धोकादायक घटक सापडल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून नाहीशी झालेली मॅगीची पाकिटे पुन्हा बाजारात दिसण्याची शक्यता, खुद्द केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी व्यक्त केली. नेस्लेच्या या प्रमुख उत्पादनावरील बंदीनंतर विदेशी गुंतवणूकदारांमध्ये भारताविषयी उत्पन्न होत असलेले शंकेखोर वातावरण नाहीसे करण्यासाठी सरकारतर्फे पुढाकार घेतला गेलाच पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
गेल्याच आठवडय़ात मध्य प्रदेशमध्ये घेतलेल्या चाचणीत मॅगी उत्तीर्ण झाली होती. केंद्रीय अन्न तांत्रिक संशोधन संस्थेनेही मॅगीबाबत काहीही गैर आढळले नसल्याचा अहवाल बुधवारी जारी केला. मात्र या अहवालानंतर ‘मॅगी आरोग्यास योग्य असल्याचा अद्याप निर्वाळा दिलेला नाही’ असे भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरण- ‘एफएसएसएआय’नेही गुरुवारी स्पष्ट केले.
या पाश्र्वभूमीवर पासवान यांनी मॅगीवरील बंदी उठण्याबाबत केलेले विधान आश्चर्यकारक ठरते. कोटय़वधींची उलाढाल असलेली लोकप्रिय मॅगी नूडल्स बाजारात पुन्हा येण्याविषयीचे संकेत त्यांनी उद्योजकांची संघटना ‘अॅसोचेम’च्या व्यासपीठावरून दिली.
मॅगीवरील बंदीमुळे अनेक खाद्यप्रेमींचा हिरमोड झाल्याचे नमूद करत भिन्न चाचण्यांचे भिन्न निकाल यामुळे हे प्रकरण एकूणच गोंधळाचे बनले आहे, अशी पुस्तीही पासवान यांनी जोडली. तथापि ‘एफएसएसएआय’ या बंदी घातलेल्या यंत्रणेच्याच मान्यताप्राप्त केंद्रीय अन्न तांत्रिक संशोधन संस्थेने (सीएफटीआरआय) मॅगीबाबत ती आरोग्यास अपायकारक नसल्याचा निर्वाळा दिल्याने मॅगी पुन्हा बाजारात येऊ शकते, असा दावा त्यांनी केला.
मॅगीवरील बंदी संबंधाने ग्राहक हित लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत मॅगीवरील बंदीमुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाल्याचे निरीक्षण पासवान यांनी या वेळी नोंदविले.
उत्तर प्रदेशमध्ये प्राधिकरणाने कारवाई केल्यानंतर मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. याविरोधात नेस्ले कंपनी न्यायालयात गेल्यानंतर तिला मॅगीच्या निर्यातीस मात्र परवानगी मिळाली आहे.
तरीही समभाग ढेपाळला
भारतीय अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ‘मॅगी’ ला अद्याप क्लीन-चीट नसल्याचा स्पष्ट केल्यानंतर भांडवली बाजारात मॅगीची प्रवर्तक असलेल्या नेस्ले इंडियाचा समभाग सत्रअखेर तब्बल ५.०३ टक्क्यांनी खाली आला. ‘एफएसएसएआय’ची मान्यता असलेल्या केंद्रीय अन्न तांत्रिक संशोधन संस्थेने (सीएफटीआरआय) मॅगीबाबत काहीही गैर आढळले नसल्याचा अहवाल बुधवारी जारी केल्यानंतर नेस्लेचे समभागमूल्य ८ टक्क्यांनी वाढले होते. गुरुवारच्या व्यवहारात मात्र नेस्लेचे मूल्य अखेर ६,४६१.१५ रुपयांवर स्थिरावले. यातून कंपनीचे बाजारमूल्य ३,३१२.११ कोटी रुपयांनी खालावले.